त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 05:47 PM2020-11-12T17:47:54+5:302020-11-12T17:57:22+5:30
सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता.
नांदेड: दुचाकी घेण्यासाठी सासरच्याकडून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत करताच पतीने पोलीस चौकीसमोरच्या मुख्य रस्त्यावर पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. तलाक दिल्यानंतर पतीने निघून जाताना आपण दुसरे लग्न करणार असल्याचेही पत्नीला सांगितले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड शहरातील एका महिलेचा विवाह हदगाव शहरातील शेख करीम शेख शमीम याच्यासोबत झाला होता. सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून विवाहितीने पतीसह इतर तिघां विरोधात इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा राग मनात धरून पतीने हदगाव येथून नांदेड शहरात येत पत्नीसोबत वाजेगाव पोलीस चौकीसमाेरील मुख्य रस्त्यावरच जोरदार भांडण केले. या भांडणात रस्त्यावरच पत्नीला तीन वेळेस तलाक, तलाक, तलाक, असा शब्द उच्चारला व यापुढे आपला संबंध नाही. मी दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले. यामुळे धक्का बसलेल्या पीडित पत्नीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून शेख करीम शेख शमीम, जुलेखा शेख शमीम आणि शिरीन शेख नाजेम (तिघेही रा. मुल्ला गल्ली, हदगाव) यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना. चंचलवाड हे करीत आहेत.