नांदेडच्या दिव्यांग लताची उत्तुंग झेप; भारतीय बॅडमिंटन संघात निवड, जपानमध्ये खेळणार
By प्रसाद आर्वीकर | Published: October 20, 2022 07:08 PM2022-10-20T19:08:12+5:302022-10-20T19:08:50+5:30
जपानमधील टोकियो येथे १ ते ७ नोव्हेंबर या काळात जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे.
नांदेड : येथील दिव्यांग खेळाडू लताताई परमेश्वर उमरेकर यांची जपानमध्ये होणाऱ्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांनी भारतीय राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवले आहे.
जपानमधील टोकियो येथे १ ते ७ नोव्हेंबर या काळात जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, त्यात नांदेड येथील लताताई उमरेकर यांनी स्थान मिळविले आहे. जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत खेळणाऱ्या लताताई या जिल्ह्यातील एकमेव दिव्यांग शटल बॅडमिंटन खेळाडू ठरल्या आहेत. लताताई यांनी आतापर्यंत ब्राझील आणि दुबई या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर पाच पदके त्यांनी मिळवले आहेत. आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत जागतिक स्पर्धेपर्यंत मजल मारणाऱ्या लताताई उमरेकर यांची कामगिरी जिल्हावासीयांसाठी अभिमानाची आहे. १ ते ७ नोव्हेंबर या काळात टोकियो येथे ही स्पर्धा होणार असून २८ ऑक्टोबर रोजी लताताई उमरेकर स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत.