मुंबई- नांदेड रेल्वेची दिवाळीभेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:52 PM2020-10-10T17:52:22+5:302020-10-10T17:52:22+5:30
मुंबई- नांदेड- मुंबई ही विशेष रेल्वे रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून दररोज सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित प्रवाशांसाठीच असणार आहे.
नांदेड : मुंबई- नांदेड- मुंबई ही विशेष रेल्वे रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून दररोज सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून ही रेल्वे पूर्णपणे आरक्षित प्रवाशांसाठीच असणार आहे.
मार्च अखेरपासून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे खूपच हाल सुरू होते. त्यातच दसरा- दिवाळीसारखे सण तोंडावर असताना दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड- मुंबई गाडी सोडण्याचा निर्णय घेवून प्रवाशांना एकप्रकारे दिवाळीची भेटच दिली आहे. गाडी क्र. ०११४१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ते हुजूर साहिब नांदेड ही गाडी दि. ११ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथून दररोज सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून मनमाड-औरंगाबाद मार्गे दुसऱ्या दिवशी पहाटे ५. ३० वा. नांदेडला पोहचेल.
तर गाडी संख्या ०११४२ हुजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई ही गाडी १२ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. ही गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वेस्थानकावरुन रोज सायंकाळी ५ वा. निघेल आणि औरंगाबाद, मनमाडमार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५. ३५ वा. पोहचेल.
१८ डबे असलेली ही रेल्वे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल.