चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स हवयं? डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:10+5:302021-08-18T04:24:10+5:30
ऑनलाइन फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठीही डाॅक्टरांना आरटीओ कार्यालयाकडूनच यूजर आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. पूर्वी फोटो चिकटवून त्यावर डॉक्टरांनी ...
ऑनलाइन फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठीही डाॅक्टरांना आरटीओ कार्यालयाकडूनच यूजर आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. पूर्वी फोटो चिकटवून त्यावर डॉक्टरांनी सही शिक्का मारला की शंभर रुपयात फिटनेस मिळत असे. परंतु, आता सदर सर्टिफिकेट ऑनलाइन द्यावे लागणार आहे. त्यामुळे बोगसगिरीला लगाम बसणार आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना दिवसांतून किती प्रमाणपत्र देता येतील, यावरही निर्बंध राहणार आहेत.
लर्निंग लायसन्स ऑनलाइन...
आरटीओ कार्यालय हे एजंटाच्या विळख्यातून काढण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारे त्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे. लर्निंग लायसन्सही ऑनलाइन काढावे लागत आहे. त्याचबरोबर इतर वाहन नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट आदींनाही ऑनलाइन नोंदणी करावी लागत आहे.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
गाडी चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आता चाळिशीनंतर नोंदणीकृत डॉक्टराचे सर्टिफिकेट असणे बंधनकारक केले आहे. वयाच्या शंभरीनंतरही आपण गाडी चालविण्याचा परवाना घेऊ शकतो, परंतु त्यासाठी डॉक्टरांकडून फिटनेस सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे.
पूर्वी आरटीओ कार्यालयाच्या समोर डॉक्टरांसह सर्वच प्रकारचे सर्टिफिकेट तत्काळ मिळायचे. शासनाने ऑनलाइनला प्राधान्य दिल्याने अनेकांचे दुकान बसले, तर एजंटची संख्या घटली आहे. दिवसभरात किती सर्टिफिकेट द्यायचे यावरही आता डॉक्टरांना निर्बंध घालते जाणार आहे.
वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात नोंदणी केलेल्या डॉक्टरांकडूनच सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक आहे. तसेच पूर्वीप्रमाणे सही, शिक्क्याचे नाही तर ऑनलाइन सर्टिफिकेट आवश्यक आहे. - अविनाश राऊत, आरटीओ, नांदेड