बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:43 AM2019-03-15T00:43:33+5:302019-03-15T00:44:19+5:30
बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़
नांदेड : बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या नांदेड शाखेचे उद्घाटन डॉ़सबनीस यांच्या हस्ते पार पडले़ यानिमित्ताने महात्मा फुले मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ मंचावर नांदेड शाखेचे अध्यक्ष माधव चुकेवाड, प्रा़सुनील नेरलकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, संजय आईलवाड, प्रकाश कानखेडकर आदींची उपस्थिती होती़ बालमनाला प्रिय असलेल्या देवतास्वरूप चांदूमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे़
ज्ञानविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे चंद्र, तारे, ग्रह, वारे आदी नवलपूर्ण बाबीतील नवलाई संपली आहे़ वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नामुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रात अपूर्व असे शोध लागले आहेत़ या पार्श्वभूमीवर विज्ञान शाप की वरदान असल्या प्रश्नांची उकल करण्यात काय अर्थ असा प्रश्न उपस्थित करीत वर्तमान काळातील माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची गरज आहे़ तरच समाजाला प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतील, असे परखड मतही डॉ़सबनीस यांनी व्यक्त केले़
बालपणाची जात ही निरागसता तर निष्पापपणा हा धर्म असतो़ याची जाणीव ठेवून साहित्यिकांनी लेखन करावे, असा सल्लाही सबनीस यांनी दिला़
कार्यक्रमाला देवीदास फुलारी, रत्नाकर वाघमारे, सुरेश अंबुलगेकर, शंतनू डोईफोडे, डॉ़पृथ्वीराज तौर, डॉ़हंसराज वैद्य, डॉ़राम जाधव, प्रा़महेश मोरे, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड, पवन आलूरकर, डॉक़ल्पना जाधव, अलका चुकेवाड, डॉ़स्वाती काटे, डॉ़अनिता पुदरोड, नेहा आलूरकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी सुगरणीचा खोपा या माधव चुकेवाड यांच्या बालगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले़ अध्यक्षीय समारोप सुनील नेरलकर यांनी केला़ तर प्रास्ताविक प्रा़डॉ़वैजनाथ अनमुलवाड यांनी केले़
वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड द्या
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बालसाहित्याचे महत्व आणि आवश्यकता व्यक्त करतानाच वर्तमान काळात माणसांच्या वैज्ञानिक दृष्टीला विवेकाची जोड देण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त केली. बालपण हे अत्यंत निरागस असते. याची जाणीवही लेखकांनी ठेवायला हवी, असा सल्लाही सबनीस यांनी साहित्यिकांना दिला.