दबावाला बळी पडू नका, दबाव आणणार्यांची नावे जाहीर करा; नांदेड मनपा आयुक्तांचे कर्मचार्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 07:10 PM2018-02-05T19:10:16+5:302018-02-05T19:10:32+5:30
जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्यांना डांबल्याचा प्रकार चर्चेत असतानाच महापालिकेतही अधिकार्यावर दबावसत्र सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचार्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. दबाव आणणार्यांची नावे जाहीर करावी, असे स्पष्ट केले आहे.
नांदेड : जिल्हा परिषद शिक्षण अधिकार्यांना डांबल्याचा प्रकार चर्चेत असतानाच महापालिकेतही अधिकार्यावर दबावसत्र सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. यानंतर आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिकारी, कर्मचार्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. दबाव आणणार्यांची नावे जाहीर करावी, असे स्पष्ट केले आहे.
सेवानिवृत्तीच्या एक दिवस अगोदर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बळवंत जोशी यांना अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी ३० जानेवारी रोजी डांबल्याचा प्रकार पुढे आला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असताना महापालिकेतही सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सेवाविषयक बाबी तसेच वैयक्तिक कामे करुन घेण्यासाठी राजकीय कार्यकर्ते व अन्य अशासकीय व्यक्तीमार्फत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही दबावाला अधिकार्यांनी बळी पडू नये, असे आयुक्त देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ च्या नियम २३ च्या तरतुदीनुसार कोणताही शासकीय कर्मचारी त्यांच्या शासकीय सेवेबाबत कोणत्याही बाबीच्या संबंधात कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव आणणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही, अशी तरतूद आहे. या तरतुदीचा भंग केल्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांनी वर्ग-३ आणि ४ च्या कर्मचार्यांसंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उपायुक्तांना प्रदान केले आहेत. याच बाबीचा लाभ घेण्याचा प्रयत्न काही अधिकारी- कर्मचार्यांकडून होत आहे.
यात राजकीय मंडळी त्यातही मनपातील सत्ताधारी हस्तक्षेप करीत आहेत. कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या संदर्भात अधिकार्यावर दबाव आणला जात आहे. काही कर्मचारीही राजकीय वरदहस्तातून आपल्याला हवी ती जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच राजकीय हस्तक्षेपालाही चालना मिळत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सर्व विभागाच्या नाड्या आवळण्याचे काम आयुक्तांनी केले आहे. परिणामी मनाजोगत्या जागी जाण्यासाठी कर्मचार्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आपल्या वरिष्ठांवर दबाव आणण्यासही मागे-पुढे पाहिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आयुक्तांनी तात्काळ घेतली दखल
आयुक्तांनी १ फेब्रुवारी २०१८ रोजी एका परिपत्रकाद्वारे अशा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार्या अधिकारी, कर्मचार्यांची नावे कळवण्याच्या आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचार्यांना सूचना दिल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे महापालिकेतही दबावतंत्राचा वापर सुरू असल्याची बाब उघड झाली आहे.