‘डिग्री’हवी आहे ना? वृक्ष लावून संवर्धन करा! विद्यापीठाकडून परिपत्रक जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:18 AM2022-09-19T07:18:49+5:302022-09-19T07:19:29+5:30
स्वारातीम विद्यापीठाकडून परिपत्रक जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन अनिवार्य केले आहे. प्रति विद्यार्थी पाच वृक्ष लागवड करून संवर्धन केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र दिले
जाणार नाही.
सर्वच विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण हा विषय अनिवार्य आहे. या विषयांतर्गत केवळ थिअरी शिकविली जाते. अंतर्गत आणि विद्यापीठ परीक्षेतील गुण यावर ग्रेड दिला जातो; मात्र खऱ्या अर्थाने वृक्ष लागवड व झाडांचे संवर्धन व्हावे, यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि संवर्धन केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा यांनी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल व विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत विद्यापीठाने तत्काळ परिपत्रक जारी करून पर्यावरण विषयांतर्गत वृक्ष लागवड आणि संवर्धन विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होऊन संवर्धन होण्यास मदत होईल.