रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांकडेही डॉक्टरांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:35+5:302021-03-27T04:18:35+5:30
नांदेड शहरातील जवळपास सर्वच खागसी रूग्णालयातील बेड हाऊसफुल असल्याचे चित्र आहे. प्रत्येक रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याचे बोर्ड ...
नांदेड शहरातील जवळपास सर्वच खागसी रूग्णालयातील बेड हाऊसफुल असल्याचे चित्र आहे. प्रत्येक रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याचे बोर्ड लावलेले दिसत आहे. त्यामुळे एका बेडवर दोन अथवा त्यापेक्षा अधिक रूग्णांना ठेवून ऑक्सिजन देण्याची वेळ येत आहे. अशा परिस्थितीतही अडमिट करून घेण्यात आलेल्या रूग्णांकडे डॉक्टर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रूग्णांचे नातेवाईक करत आहेत.
कोरोना रूग्णांना ॲडमिट केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कुठलीही माहिती दिली जात नाही. तसेच एकवेळ लिहून दिलेली औषधीच रूग्णांना देण्याच्या सूचना संबंधीत वाॅर्ड बॉय अथवा नर्स, ब्रदर्सला दिल्या जात आहे. त्यानंतर दोन दोन दिवस डाॅक्टरांकडून त्या रूग्णांना तपासले जात नाही. तसेच माहितीही घेतली जात नाही. नातेवाईकांनी उडवाउडवीची उत्तरे काही डॉक्टर देत आहेत. त्यामुळे प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, अशी मागणी रूग्णांच नातेवाईक करत आहेत.
औषधांच्या नावाखाली आर्थिक लुट
नांदेड शहरातील बहुतांश रूग्णालये कोरोना रूग्णांना विनाकारणची औषधी लिहून देवून त्यांची आर्थिक लूट करत असल्याचे चित्र आहे. रूग्णांना गरज नसतानाही मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्यांची भली मोठी यादी देण्यात येत आहे. ते साहित्य वापरले जाते की नाही याबाबतही शंकाच आहे. त्यात अनेकांना पीपीई किटचेही बिल लावले जात आहे. काहींना खरेदी करून रूग्णालयात देण्यासाठी सांगितले जाते. रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णापर्यंत जाता येत नाही. त्यामुळे रूग्णाला नेमके कोणते औषधी दिली अथवा त्यासाठी खरेदी केलेले साहित्य त्या रूग्णालाच वापरले हे रामभरोसे आहे. त्यामुळे ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रत्येक वार्डात तसेच रूग्ण उपचार घेत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी हाेत आहे.