रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टराची दांडी,बालकाचा मृत्यू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:48 AM2018-10-18T00:48:15+5:302018-10-18T00:48:38+5:30
तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाच वर्षीय बालकास झटके येत असल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ, नातेवाईकांनी करुन रुग्णालयास टाळे ठोकले. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुदखेड : तालुक्यातील रोहीपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पाच वर्षीय बालकास झटके येत असल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ, नातेवाईकांनी करुन रुग्णालयास टाळे ठोकले. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठविण्यात आले.
गुरुराज गजानन शिंदे(वय ५ रा. रोहीपिंपळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याला आईवडिलांनी १६ रोजी सकाळी ६.३० च्या दरम्यान रोहीपिंपळगाव येथील प्रा.आ. केंद्रात दाखल केले. कर्तव्यावरील एमपी एमपीडब्ल्यू कर्मचारी निलपत्रेवार यांनी त्याला दाखल करुन घेतले. मात्र निलपत्रेवार यांच्याशिवाय इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित नसल्याने बालकावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. काही नातेवाईकांनी तालुका आरोग्य अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल उचलला नाही, असा आरोप कुटुंबियांचा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना घटनेची सविस्तर माहिती भ्रमणध्वनीवरून दिली़ त्यावरून नऊ वाजून दहा मिनिटाला डेपोटेशनवर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजद खान हे रुग्णालयात हजर झाले व गुरुराज गजानन शिंदे यास तपासणी केली असता तो मयत झाला असल्याचे आढळून आल्याने वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले.
घटनेची माहिती वाºयासारखी गावात पोहोचली. संतप्त नागरिकांंनी धाव घेवून रुग्णालयास टाळे ठोकले. रुग्णालयापुढे मयत गुरुराज शिंदे याचा मृतदेह ठेवून संबंधित अधिकारी, कर्मचा-यांचा निषेध केला. यावेळी माजी जि. प. सदस्य गणेशराव शिंदे, तालुका उपप्रमुख पिंटू पाटील वासरीकर, आनंदराव शिंदे, माधवराव शिंदे, पुंडलिक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, चक्रधर शिंदे, गुरुराजचे वडील गजानन शिंदे आदी उपस्थित होते. मयतावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, एका शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्याधिकाºयांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
मी रजेवर असून माझ्या सासूबाई मयत झाल्यामुळे मी मुंबई येथे आलो. रोहीपिंपळगाव येथील घटनेबद्दल फोनवरच प्राथमिक माहिती मिळाली. माझ्याकडे सविस्तर माहिती उपलब्ध नाही़ मी मुदखेड येथे आल्यावर सर्व बाबींची माहिती देईल. -डॉ.राजेंद्र पवार, तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड़