परजिल्ह्यातील डॉक्टर्सना देगलूर तालुक्यात नियुक्ती, स्थानिक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:12 AM2019-03-14T00:12:46+5:302019-03-14T00:13:16+5:30
कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे.
देगलूर : कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत स्थानिक अथवा जिल्ह्यातील डॉक्टराना डावलून इतर जिल्ह्यांतील डॉक्टरांना संधी दिल्यामुळे यासंबंधी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डॉक्टर मंडळींनी लेखी तक्रार केली आहे.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथे कम्युनिटी हेल्थ आॅफिसर या पदासाठी शासनाने जाहिरात काढली होती. या जाहिरातीत नांदेड जिल्ह्यातील देगलूर, लोहा, माहूर, किनवट व अन्य सहा तालुक्यांचा समावेश होता. सदरील भरतीतील निवडप्रक्रियेमध्ये स्थानिक तालुक्यातील उमेदवारास तालुक्याचे १० व जिल्ह्याचे १० असे एकूण २० गुण अतिरिक्त व स्थानिक उमेदवारास प्राधान्य होते. यातून स्थानिक वैद्यकीय पदवीधरांना रोजगाराची संधी मिळावी याद्वारे स्थानिक जनतेस चांगल्याप्रकारे मूलभूत आरोग्य सेवा प्राप्त व्हावी हा शासनाचा उद्देश होता. स्थानिक डॉक्टर्सना प्रथम नियुक्ती देणे या नियमास बगल देऊन लातूरच्या आरोग्य उपसंचालकांनी बाहेरील हिंगोली जिल्ह्यातील उमेदवाराना नियमबाह्य रितीने देगलूर व लोहा तालुक्यात नियुक्ती देऊन अजब कारभाराचे गजब दर्शन घडवले आहे. यामुळे देगलूर, लोहा परिसरातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक बेरोजगार डॉक्टरांच्या स्वप्न हवेतच विरले आहेत. याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर ते आरोग्य उपसंचालकाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. याबत योग्य न्याय मिळावा, या भूमिकेतून देगलूरच्या डॉक्टरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त, आरोग्य सेवा अभियान मुंबई यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.
निवेदनावर डॉ. योगेश दाचावार, डॉ. श्रीराम बिरादार, डॉ.बालाजी बिरादार, डॉ. सुनील जाधव, डॉ. रघुनाथ क्षेत्री, डॉ.अमित शहापुरकर, डॉ. निलराज पाटील, डॉ.बालाजी गुजे, डॉ.केदार उप्पलवार, डॉ.मल्लिकार्जुन पाटील, नम्रता खानापुरे यांच्यासह सर्व डॉक्टरांच्या स्वाक्षºया आहेत.