कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:20 AM2021-05-25T04:20:47+5:302021-05-25T04:20:47+5:30
नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. डॉक्टरांच्या कामाचे तास आणि मानसिक ...
नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. डॉक्टरांच्या कामाचे तास आणि मानसिक थकव्यामध्येही वाढ झाली आहे. पुरेशी झोप नसणे, सारखा तणाव आणि जेवणाचे बिघडलेले नियोजन यामुळे अनेक डॉक्टरांचे वजन या काळात मोठ्या प्रमाणात घटले आहे. तर काहींना इतर व्याधींनी ग्रासले आहे.
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने उपलब्ध डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दररोज डोळ्यासमोर होणारे रुग्णाचे मृत्यू पाहून ते मानसिकदृष्ट्याही थकले आहेत. परंतु त्यानंतरही अखंडपणे सेवा देत आहेत. या काळातील ताणतणावामुळे डॉक्टरांचे स्वास्थ बिघडत चालले आहे. नियमित आहार आणि व्यायाम नसल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होत आहे.
आहाराची घेतात काळजी
कोरोना काळात प्रचंड ताणतणाव असतानाही काही डॉक्टर मात्र नियमितपणे आपली काळजी घेत आहेत. स्वत:ला संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घेत आहेत.
त्याचबरोबर नियमित वॉकिंग, योगा आणि पौष्टिक आहार घेत आहेत. शक्यतो जेवणाच्या वेळा बदलणार नाहीत, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अनेकजण रुग्णालयातच जेवणाचा डबा घेऊन जात आहेत. जेवणामध्ये फळे, अंडे, दूध यासह हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढविण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयावर कोरोनामुळे ताण वाढला आहे. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यावर उपचार करताना मोठी धावपळ करावी लागली. त्यातच बैठका, झूम मिटिंग यासह इतर प्रशासकीय कामांमुळे कामाचे तास वाढले आहेत. त्यात पुरेशी झोप आणि वेळेवर जेवण नसल्यामुळे शरिरावर त्याचा परिणाम झाला आहे. परंतु नियमित व्यायाम मात्र करतो.
- डॉ. निळकंठ भोसीकर,
डॉक्टर
रुग्णालयातील सर्व रुग्णांची तपासणी करणे, नातेवाईकांशी संवाद साधणे यासह रात्री-बेरात्री झोपमोड करून रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे कामाचे तास वाढले आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच वेळापत्रक बिघडल्याने वजनातही घट झाली आहे.
- डॉ. प्रशांत बारबिंड, डॉक्टर