माळेगाव यात्रेत गाढव खातेय भाव; काठेवाडी, लसण्या जोडीची किंमत तब्बल ६० हजारांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:10 PM2022-12-29T13:10:09+5:302022-12-29T13:10:44+5:30
तालुक्यातील माळेगाव येथील यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
- गोविंद कदम
लोहा (जि. नांदेड) : गाढव शब्द उच्चारताच आपोआपच अज्ञानी, काही न समजणारा, शहाणा नसलेला असे कितीतरी अर्थ माणसाप्रती प्रतिध्वनीत होतात. परंतु, वास्तवातील गाढव हा प्राणी किती कष्टाळू, उपयुक्त आहे, हे आपण लक्षात घेत नाही. परंतु, या गाढवाची किंमत किती असते, हे गरजूंना कळल्यामुळे माळेगावच्या यात्रेत गाढव भाव खात आहे.
तालुक्यातील माळेगाव येथील यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे या यात्रेतील गाढवांचा बाजार देखील शेकडो वर्षांपासून एक वैशिष्ट्य जपून आहे. या भागातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार या यात्रेत भरतो. हजारो गाढवांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल या ठिकाणी होत असते. यंदा गाढवाच्या जोडीची किंमत ६० हजारांवर गेली.
श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबा देवाच्या यात्रेत उंदरापासून ते उंटापर्यंतचे सर्वच प्राणी व पक्ष्यांचा बाजार भरतो. कोरोनामुळे तीन वर्षे यात्रा भरली नाही. यंदा २२ तारखेपासून ही यात्रा सुरू झाली. शासकीय नियोजनानुसार ही यात्रा २६ तारखेपर्यंत असली तरी यानंतरही सुमारे चार-पाच दिवस यात्रा चालते. यंदा गाढवांचा बाजारही चांगला भरलाय. अनेक राज्यातून काठेवाडी, लसण्या, खेचर, जंगली या जातींची गाढवं विक्रीसाठी आली आहेत. यंदा काठेवाडी, लसण्या गाढवांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसते. ४० हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत गाढवाची जोडी विक्रीसाठी आली आहे.
यंदा गाढव करायची खरेदी आणि पुढल्या वर्षी पैसे द्यायचे
गाढवांच्या खरेदी-विक्रीची अनोखी परंपरा आजही काही प्रमाणात पाळली जाते. यंदा सौदा करून थोडीबहुत किंमत देऊन गाढव घेऊन जायचे व पुढच्या वर्षी सौदा केलेली संपूर्ण किंमत अदा करायची, ही विश्वासाची परंपरा आजही पाळली जात आहे. अनेक राज्यांतून काठेवाडी, लसण्या, खेचर, जंगली या जातींची गाढवं विक्रीसाठी आली आहेत. यंदा काठेवाडी, लसण्या गाढवांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसते.