रान पेटविण्याची वेळ आणू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:37+5:302021-08-21T04:22:37+5:30
१२७व्या घटनादुरुस्तीने आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्याची असल्याचे केंद्राने सांगितले, तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवा, अशी मागणी राज्याने ...
१२७व्या घटनादुरुस्तीने आरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्याची असल्याचे केंद्राने सांगितले, तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. दोन्ही सरकारांनी काय करायचे ते करावे, परंतु आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे. राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे जोपर्यंत सिद्ध होणार नाही, तोपर्यंत समाजाला आरक्षण मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पंधरा पानी पत्रावरही संभाजी राजेंनी नाराजी व्यक्त केली. शासनाने १४ जुलैला जीआर काढला होता. त्यानुसार २०१४ ते कोरोना काळापर्यंत ज्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना रूजू करुन घ्या, असे त्यात म्हटले होते. परंतु जात प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्याने गरीब मराठा समाजाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे असा जीआर काय कामाचा? असा सवालही त्यांनी केला. आरक्षणासाठी अशीच बनवा बनवी सुरू राहिल्यास आम्हाला दिल्ली आणि मुंबईवर चाल करून जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकट- फक्त एका वसतिगृहाचे झाले उद्घाटन
शासनाने १५ ऑगस्टपर्यंत राज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी २३ वसतिगृहे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यातील फक्त एका वसतिगृहाचे उद्घाटन झाले. तेही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे शिंदे यांचे आम्ही आभार मानतो. अजूनही वेळ हातातून गेलेली नाही. त्यामुळे सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
चौकट- मावळ्यांनो मास्क वापरा...
आपण सर्व खरे मराठा आहोत. आपली ताकद दाखविण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. परंतु अजून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नाही. समोर बसलेल्या अनेकांनी मास्क घातले नाहीत. परंतु असे करू नका. मास्क वापरा, तब्बेतीला जपा, असा प्रेमाचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. तसेच भाषणापूर्वी आपल्या खिशातील सॅनिटायझरची बाटली काढून माईक सॅनिटाईज केला.
भाजप, सेना, काँग्रेस प्रतिनिधींची हजेरी
मूक आंदोलनात भाजपाचे खा. प्रताप चिखलीकर, सेनेचे खा. हेमंत पाटील, आ. मोहन हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. तुषार राठोड, आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती होती.
पोलिसांनी केले योग्य नियोजन
मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे स्पष्ट होते. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबू नये किंवा कुठे गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले. वाहतूक इतर मार्गांनी वळविली होती. तसेच आंदोलन संपताच काही वेळातच हा रस्ताही वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.