दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:57+5:302021-05-07T04:18:57+5:30
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांमध्ये गैरसमज असल्याने लसीकरणाबाबत उदासीनता दिसून आली होती. ...
जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांमध्ये गैरसमज असल्याने लसीकरणाबाबत उदासीनता दिसून आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागृती केल्याने लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक नागरिकांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. लसीकरण केंद्रांसमोर नागरिक गर्दी करत आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, सहव्याधी व ६० वर्षांवरील नागरिक लस घेत आहेत. यातील अनेकांच्या पहिल्या डोसला ४० हून अधिक दिवस झाले आहेत. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे दुसरा डोस नेमका किती दिवसांनी घ्यायचा, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच लसीचा तुटवडा असल्याने पहिला डाेस घेणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांची विविध केंद्रांमध्ये भटकंती सुरू आहे. परिणामी अनेकांच्या दुसऱ्या डोसला विलंब होण्याची शक्यता आहे. याबाबत लसीकरण केंद्रात कोणतीही माहितीपत्रके लावण्यात आली नाहीत. केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यस्त आहेत. त्या ठिकाणी कोणतीही माहिती मिळत नाही. अशा परिस्थितीत दुसरा डोस केव्हा घेणार याची माहिती मिळाली नाही तर कसे होणार, हा प्रश्न अस्वस्थ करीत आहे.
चौकट- काही दिवसांतच वाढतात अँटिबॉडी
कोविड लसीच्या दोन डोसांमध्ये ४ ते ६ आठवड्यांचे अंतर असावे, असे लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा ठरवण्यात आले होते. परंतु वैज्ञानिक संशोधनानंतर काढलेला निष्कर्ष व आयसीएमआर, कोरोना टास्क फोर्सनुसार कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधले हे अंतर वाढवून ६ ते ८ आठवडे करण्यात आले. लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटिबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात.
चौकट- लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?
लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित माहितीनुसार कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये सहा आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ५५.१ टक्के परिणामकारक ठरते. १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर ८१.३ टक्के परिणामकारकता आढळून आली आहे.
सहा ते आठ आठवड्यांनंतर दुसरा डोस घ्यावा
नागरिकांनी दुसरा डोस हा सहा ते आठ आठवड्यांनंतर घ्यावा. यात घाबरण्याचे काही कारण नाही. कोविशिल्डच्या लसीच्या दोन डोसमध्ये आठ आठवड्यांचे अंतर असेल तर परिणामकारकता चांगली आढळून आली आहे. - डॉ. संजय शिंदे, नांदेड