ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 06:52 PM2024-11-08T18:52:10+5:302024-11-08T18:53:45+5:30

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

Don't you want to speak for OBCs? An angry question of OBC leader Laxman Hake during the protest march at Kandahar Police Station | ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

- मारोती चिलपिपरे 
कंधार (नांदेड) :
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गुरुवारी रात्री घडली. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. जेथे घटना घडली त्या कंधारमध्ये तर आज दुपारी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहरातील भीमगड येथून कंधार पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा धडकला. यावेळी हाके म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातोय. ओबीसी समाजातील व्यक्ती विधानसभेला उभे राहिलेले यांना आवडत नाही, आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? आम्ही निवडणुकीला उभं रहायचं नाही का? असा सवाल यावेळी हाके आणि उमेदवार चंद्रसेन पाटील यांनी केला. 

काय घडले गुरुवारी रात्री 
लोहा विधानसभा उमेदवार म्हणून चंद्रसेन सुरनर निवडणुक लढवित आहे. त्यानिमित्ताने ७ रोजी कौठा येथे प्रचारसभेसाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे गुरुवारी रात्री येत असताना साडेआठच्या सुमारास बाचोटी येथे १०० ते १५० जणांनी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील यांचा विजय असो, प्रा. लक्ष्मण हाके यांचा निषेध अशा घोषणा देत रस्ता अडवला. यावेळी उमेदवार चंद्रसेन सुरनर, माधव मुसळे, उत्तमराव चव्हाण आदींची वाहने देखील अडविण्यात आले. अचानक काही जण हाके यांच्या गाडीच्या बोनेटवर चढले. तर काहींनी दगडफेक करत हाके यांच्या कारचा (एएच ५० एल ३४५) मागील काच फोडली.

हल्ला करणारे १० जण अटकेत
याप्रकरणी कंधार पोलिसांनी ८ रोजी फिर्यादी विकास भगवान कोकाटे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून आरोपी रघुनाथ हनुमंता धोंडगे, रमेश केशवराव धोंडगे, शिवशंकर मारोतराव धोंडगे, दत्ता गोविंदराव वरपडे, यादव जगन्नाथ वरपडे, दत्ता रामजी धोंडगे, बालाजी रघुनाथ वरपडे, सचिन शिवाजी दूरपडे, हनुमंत शिवाजी दूरपडे, शिवशंकर बळीराम धोंडगे या १० आरोपी ताब्यात घेतले असून व इतर १५ ते २० आंदोलक सर्व रा. बाचोटी येथील असून अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले हे करीत आहेत.

Web Title: Don't you want to speak for OBCs? An angry question of OBC leader Laxman Hake during the protest march at Kandahar Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.