उस्माननगर पोलीस वसाहतीची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:52 AM2018-05-26T00:52:14+5:302018-05-26T00:52:14+5:30
उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
बारूळ : उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निम्म्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवासस्थाने उपलब्ध नसल्याने व असलेल्या निवासस्थानांपैकी फक्त दोनच राहण्यायोग्य असलेल्या घरामुळे येथील ९० टक्के कर्मचारी परिसरातील घरात किरायाने राहून कर्तव्य पार पाडत आहेत़
उस्माननगर पोलीस ठाण्यामध्ये एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, जमादार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई व चालक आहेत़ एकूण कर्मचारीसंख्या ४३ आहे़ या कर्मचाºयांसाठी सन १९७० मध्ये निवासस्थाने (पोलीस वसाहत) बांधण्यात आली़ त्यात २ अधिकारी निवासस्थाने व १७ कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली; पण या वसाहतीला ५० वर्षे झाल्यामुळे ही वसाहत पूर्णपणे जीर्णावस्थेत आहे़ सध्या या १९ वसाहतीपैकी एक अधिकारी वसाहत व दोन कर्मचारी वसाहतीत राहतात़ बाकी १६ वसाहत पूर्ण मोडकळीस व जीर्ण अवस्थेमुळे येथे कोणताही कर्मचारी राहत नाही़
या सर्व वसाहतीची पूर्ण पडझड झाली असून सर्व इमारतीचे स्लॅब पडलेले, मोडकळीस आलेले, भिंती उखडून त्यात साप राहतात़ काटेरी झुडुपांचे माहेरघर झाले आहे़ पावसाळ्यात पाणी सर्व घरांत एक ते दोन फूट साचलेले असते़ त्यामुळे या घरात कोणताही कर्मचारी राहत नाही़
कलंबर येथील चौकी ही सध्या तंटामुक्त भवनात आहे़ येथे चौकीसाठी ग्रा़पं़ २० गुंठे जमीन दिली; पण इमारतीचा प्रस्ताव करूनही इमारत अजूनही उभी झाली नाही़ त्यामुळे येथील वसाहतीचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी सा़बां़विभागाकडून करून चार वर्षे झाली,मात्र याची दखल न घेतल्याने कर्मचाºयांत नाराजी आहे़
या वसाहतीच्या नवीन इमारतीकरिता व दुरुस्तीकरिता सा़बां़ विभागास या कार्यालयाच्या अंतर्गत २०१५-१६ व २०१७ ला पत्रव्यवहार केला; पण त्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली़
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६२ महसुली गावे व वाडी, तांडे आहेत़ त्यात दोन चौकीही आहेत़ या दोन्ही चौकी इमारतीची दयनीय अवस्था आहे़ एक चौकी कापसीला आहे़ येथील इमारत मोडकळीस आल्यामुळे या चौकीचा कारभार मारतळाहून करण्यात येतो़
उस्माननगर पोलिसांची वसाहत ही जीर्ण अवस्थेत आहे़ या इमारतीत कोणताही कर्मचारी राहण्यायोग्य नाही़ सा़बां़ विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करूनही वसाहतीचा प्रश्न काही मिटेना.-संतोष पाटील, पोलीस निरीक्षक, उस्माननगऱ