डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

By शिवराज बिचेवार | Published: November 14, 2024 06:21 PM2024-11-14T18:21:54+5:302024-11-14T18:24:04+5:30

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत.

Dozens of veterans have changed party, but why is the discussion only about Ashokrao Chavan? | डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत माजी मंत्री, खासदार, आमदार अशा डझनावर दिग्गजांनी पक्षांतर केले आहे. काही जणांनी तर वर्ष-दोन वर्षाला पक्ष बदलले आहेत, परंतु या सर्वांमध्ये चर्चा फक्त एक वेळेस पक्ष बदललेल्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणांचीच होते. 

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत. परंतु, त्यांच्या पक्षांतरावर जाहीरपणे कुणीही बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव किन्हाळकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपत प्रवेश केला होता, परंतु दहा वर्षांत पक्षाने कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली नसल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी घरवापसी केली. 

माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी, तर यंदा विक्रमी सहाव्या वेळी पक्षांतर करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, लोकस्वराज्य अशा अनेक पक्षांत ते फिरून आले. ते लोहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गट असे पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे. 

माजी खासदार भास्करराव खतगावकर हे काँग्रेसकडून तीन वेळा लोकसभेत पोहचले होते, परंतु त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते सूनबाई मिनल खतगावकर यांच्यासह काँग्रेसमध्ये आले होते, परंतु माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यानंतर लोकसभेच्या वेळी ते पुन्हा भाजपत आले. अन् आता विधानसभेला भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी सूनबाई मिनल यांच्यासह पुन्हा काँग्रेसची वाट धरली. मिनल खतगावकर सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत. 

माजी आमदार सुभाष साबणे हे अगोदर शिवसेनेत होते. नंतर ते भाजपत गेले. भाजपकडून देगलूरची विधानसभा पोटनिवडणूक लढविली होती. त्यात पराभूत झाले. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे परिवर्तन आघाडीचा झेंडा हाती घेतला. सध्या ते देगलूरमध्ये प्रहारचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विधान परिषदेला क्रॉस वोटिंग केल्यामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर अशोकरावांच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश करून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. 

किनवटचे भीमराव केराम हे अगोदर भारिप बहुजन महासंघात होते. नंतर अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविली होती. सध्या भाजपचे आमदार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते हे अगोदर काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपत आल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी करीत ते रिंगणात उतरले होते, परंतु बंडखोरीनंतरही भाजपने त्यांच्यावर महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी बंडाचे निशाण फडकविले असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला पक्षांतराचा मोठा इतिसहा आहे, परंतु या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा ही अशोकरावांच्या पक्षांतराचीच केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर अलीकडच्या काळात पक्षातील काही जणांकडून अशोकरावांची अडवणूक करण्याचे षडयंत्र सुरू होते. त्यामुळे पक्षांतर्गत संघर्षाला कंटाळून बाहेर पडल्याचे अशोकरावांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे.

सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण
जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांचाही बोलबाला आहे. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यात सर्वाधिक बंडखोरी ही भाजपत झाली आहे. भाजपने आतापर्यंत सहा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, तर उद्धवसेनापाठोपाठ काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई केली आहे, परंतु बंडखोरांवरही फारशी चर्चा होताना दिसत नाही.

Web Title: Dozens of veterans have changed party, but why is the discussion only about Ashokrao Chavan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.