पोलीस होण्याचे स्वप्न लांबणीवर; तरूण नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:03+5:302021-01-10T04:14:03+5:30

नांदेड : शासनाने पोलीस भरतीचा शासन आदेश (जीआर) रद्द केल्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरूणांचा हिरमोड ...

On the dream of becoming a policeman; Young angry | पोलीस होण्याचे स्वप्न लांबणीवर; तरूण नाराज

पोलीस होण्याचे स्वप्न लांबणीवर; तरूण नाराज

Next

नांदेड : शासनाने पोलीस भरतीचा शासन आदेश (जीआर) रद्द केल्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरूणांचा हिरमोड झाला आहे. मागील दोन वर्षांपासून थांबलेली पोलीस भरती आता कधी होणार, याची प्रतीक्षा या तरूणांना करावी लागणार आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी परिश्रम घेणाऱ्या तरूणांना पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्याने आता गावाकडे परतावे लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक तरूण नांदेड शहरात पोलीस भरतीसाठी येऊन प्रयत्न करतात. यामध्ये अनेकांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. कमी वेळेत नोकरी मिळविण्याचा एकमेव मार्ग पोलीस भरतीचा असल्याने अनेक तरूण यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. मात्र, आता भरतीच लांबणवीवर पडल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यात १०३० लोकांमागे एक पोलीस

जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास ३६ लाख असून, पोलिसांची संख्या ३ हजार ५०० आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये पोलिसांची मोठी कमतरता आहे. विशेष म्हणजे एका पोलिसामागे १ हजार ३० लोक आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने मोठी तफावत असल्याने पोलीस भरतीची आवश्यकता आहे.

मागील सात-आठ महिन्यांचा काळ हा कोरोना व लाॅकडाऊनमध्ये गेला. याकाळात मोठा त्रास वाट्याला आला. घरची परिस्थिती हालाखीची आहे. पोलीस भरती होत असतानाच पुन्हा भरतीची प्रतीक्षा वाट्याला आली आहे.

- राजू ढोबळे, रा. ठाणकी, ता. उमरखेड

मागील दोन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आता भरती होईल, असे वाटत असतानाच पुन्हा भरती लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उत्साह कमी झाला आहे. नांदेडात येऊन मी तयारी करत होतो. मात्र, आता गावाकडे जाणार आहे.

- राहुल ठाकरे, रा. यवतमाळ

२०१७पासून मी पोलीस भरतीची तयारी करत आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेऊन कमी वेळेत नोकरी मिळविण्याचे स्वप्न पाहात होतो. मात्र, आता हे स्वप्न लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे.

- शुभम भुसारे, कुपटी, ता. माहूर

Web Title: On the dream of becoming a policeman; Young angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.