पाणीदार गावासाठी भोकर तालुक्यातील ग्रामस्थांचे हात एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:37 AM2018-04-09T00:37:53+5:302018-04-09T00:37:53+5:30
पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : पाणीदार गाव करण्यासाठी एक नव्हे हजारो हाथ एकवटून श्रमदानाला लागल्याने पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.
नाम फाऊंडेशनने सुरु केलेल्या वाटरकप ३ स्पर्धेत तालुक्यातील ५३ गावांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत स्पर्धा जिंकण्याची जिद्द उराशी बाळगून गाव पाणीदार करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वर्षानुवर्षाचा दुष्काळ, उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष, पाण्यासाठी वणवण भटकंती यावर मात करून गाव पाणीदार करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब शिवारात मुरावा, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी अंग झटकले आहे. स्पर्धेतील ५३ गावातील प्रतिनिधींना नाम फाऊंडेशनच्या वतीने प्रशिक्षण दिल्या नंतर पाणी बचतीचे तंत्र अवगत करून गावागावात पाणी बचतीच्या चळवळीला सुरवात झाली आहे. सध्या २५ गावात स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होवून रविवार सुट्टीचा दिवस असूनही तालूक्यातील वाकद, समंदरवाडी, बल्लाळ, सोनारी, मातुळ, कामणगाव या गावातील अबाल वृद्ध सकाळपासून हातात कुदळ,फावडे, टोपले घेऊन श्रमदान करत होते़ केली.
सरपंच शारदा वाकदकर, उपसरपंच सोपान माझळकर, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ वाघमारे, पांडुरंग वाकदकर, शाळेचे मु.अ. एम.पी.भीसे, तलाठी ज्योती राठोड, अंगणवाडी सेविका वंदना वाकदकर, आशा वर्कर उज्वला वाघमारे आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. पाणीदार गावासाठी पाणी फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक बापूसाहेब लुंगेकर,तांत्रिक प्रशिक्षक सत्यप्रेम नरवले, अमोल माने,अमोल गायकवाड परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन सीताराम खंडागळे यांनी केले. तर वनरक्षक गव्हाणे यांनी आभार मानले.
तालुक्यातील वाकद येथे संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या ९५ विद्यार्थ्यांनी गावातून जनजागरणाची प्रभातफेरी काढली. त्यानंतर गावातील बालक, महिला, वृद्वासह सर्व ग्रामस्थांनी शिवार गाठून श्रमदानातून शेतीचे बांध, दगडी बांध अशी विविध कामे केली. यात महिलांचा, बालकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी ग्रामस्थांना पाणी बचतीचे मार्गदर्शन करण्यात आले.