चालकाच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:16+5:302020-12-15T04:34:16+5:30
१४ प्रवासी बालबाल बचावले. गडगा: नरसीहून कंधारला जाणाऱ्या धावत्या बसचे मागील बाजूचे दोन्ही चाक निखळून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या ...
१४ प्रवासी बालबाल बचावले.
गडगा: नरसीहून कंधारला जाणाऱ्या धावत्या बसचे मागील बाजूचे दोन्ही चाक निखळून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या नाल्यात जाऊन पडले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याने चालक, वाहकासह अन्य १४ प्रवासी बालबाल बचावले. ही घटना नरसी-मुखेड रस्त्यावर कोपरा फाट्यानजीक १३ डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. या घटनेने राज्य परिवहन महामंडळाच्या भंगार झालेल्या बसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कंधार आगाराची बस क्रमांक एम एच २० बीएल ०३३२ नरसी-कंधार ही बस नरसी स्थानकातून कंधार जाण्यासाठी सकाळी १०.३५ वाजता मार्गस्थ झाली. बसमध्ये एकूण १४ महिला, पुरुष प्रवासी होते. दरम्यान, ही बस नरसी-मुखेड रस्त्यावर कोपरा फाट्यानजीक आली असताना बसच्या मागील बाजूच्या टायरचे नटबोल्ट निसटले ही बाब चालक भगवान पेठकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान राखून बस थांबविण्यासाठी प्रयत्न केले तोपर्यंत बसचे दोन्ही चाक निखळून बाजूस असलेल्या १०० फूट दूर अंतरावरील ४० फूट खोलवर मोठ्या नाल्यात जाऊन पडले. अन् बस थांबली या घटनेने प्रवासी घाबरले. घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन चालक, वाहक, प्रवासी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा प्रवाशांनी नरसी-कंधार रस्त्यावर भंगार बसेस चालवल्या जातात त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता दावणीला बांधली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवासी बारूळकर यांच्यासह अन्य प्रवाशांनी व्यक्त केली.
चालक भगवान पेठकर म्हणाले, सुरूवातीला चाकाचे दोन नटबोल्ट निघून गेले, ही बाब लक्षात येताच गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दोन्ही चाक ही निसटून दूर खोल खड्ड्यात जाऊन पडले.
वाहक एम.एम.शेकापुरे म्हणाले, साहेब, काय सांगावे आमचे दुख आम्हालाच माहीत. बरं झाले कुणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.