वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:22 AM2019-06-06T01:22:06+5:302019-06-06T01:23:20+5:30
जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़
नांदेड : जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेपासून वंचित असलेल्या वाहन, परिचर यांच्या सार्वत्रिक जिल्हातंर्गत बदल्यांचे वेळापत्रक अखेर प्रशासनाने घोषित केले असून ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर व वाहन चालकांच्या बदल्या समुपदेशनाने होणार आहेत़
‘लोकमत’ने २ जून रोजी शिपायांना उरला वाली ना कोणी हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने बदलीच्या संदर्भात तातडीने पावले उचलली़ जिल्हा परिषदेत १ जूनपासून वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना प्रारंभ झाला आहे़ या बदल्या ७ जूनपर्यंत करण्यात येणार आहेत़ बदली प्रक्रियेत वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मात्र फाटा देण्यात आला होता़ त्यामुळे अनेक वर्षापासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनचालक, परिचर यांचा हिरमोड झाला होता़ प्रशासनाकडून बदल्यांसाठी दखल घेतली नसल्यामुळे संतापाची भावना कर्मचाºयांत मनात निर्माण झाली होती़
जिल्हा परिषदेतील परिचर वर्ग ४ मधील १ हजार ८० शिपाई पदे मान्य असून साडेनऊशे कार्यरत आहेत़ परंतु बदलीपात्र कर्मचाºयांना यंदाही बदल्यापासून वंचित राहावे लागणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता़ शिपाईपदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु मागील ३ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ अनेक कर्मचारी दुर्गम भागात तसेच किनवट, माहूर या तालुक्यात कार्यरत होते़ या कर्मचाºयांना बदलीचे वेध लागले होते़ बदलीसाठी पात्र असतानाही त्यांच्या बदल्या होत नव्हत्या़ त्यामुळे या कर्मचाºयावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती़ परिचर, वाहनचालक यांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात येतात़ मात्र जिल्हा पदिषदेने या बदल्यांची प्रक्रिया राबवलीच नव्हती़ वाहनचालकांनी अनेकवेळा बदलीसाठी विनंती केली़ मात्र त्याकडे दुर्लक्ष केले़ यावेळी सीईओ काकडे यांनी वाहनचालक, परिचर यांच्याही बदल्या करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते़ त्यानुसार वाहनचालक व परिचर यांच्या बदल्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले़ ६ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत परिचर तर १२ ते बदल्या संपेपर्यंत वाहनचालकांच्या बदल्या होणार आहेत़
बदली प्रकियेस सुरुवात
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात १ जूनपासून वर्ग ३ च्या कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेस सुरूवात झाली़सर्व विभागाच्या बदल्या पार पडत असताना वर्ग ४ च्या कर्मचाºयांनी बदलीची मागणी केली होती़ यासंदर्भात जि़ प़ कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत चर्चा करून या बदल्या करण्याची मागणी केली होती़