Drought In Marathwada : कंधार तालुक्यातील सोनमाळ्यासह ४० तांडे ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:26 PM2018-11-19T17:26:34+5:302018-11-19T17:33:23+5:30
दुष्काळवाडा : सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे.
- गंगाधर तोगरे, कंधार (जि.नांदेड)
कंधार तालुक्यात दुष्काळी चटके, रोजगाराचा अभाव, मुला-मुलींचे विवाह व उच्चशिक्षणाचा प्रश्न आदींनी गांगरून गेलेल्या तांड्यावरील नागरिकांनी ऊसतोडणीसाठी व रोजगारासाठी हंगामी स्थलांतर केल्याने तांडे ओसाड पडल्याचे चित्र आहे. सोनमाळतांड्यासह ४० हून अधिक, तांड्यांवरील स्त्री-पुरूष बालकांसह रोजगारासाठी भटकंती करीत असल्याने बहुतांश घरे कुलूपबंद असल्याचे भयावह चित्र आहे.
तालुक्यात यावर्षी अवेळी झालेल्या व परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे खरीप हंगामावर पाणी फेरले. बोंडअळीचा ससेमिरा, सोयाबीनची मर रोगाने केलेली वाताहत, पिकांचा घटलेला उतारा आदींने दुष्काळाच्या चटक्यात शेतकरी अडकला. खरीप हंगामाने शेतकरी व शेतमजुराची निराशा केली. त्यामुळे कामासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व विवाहाला लागणाऱ्या खर्चाची तजवीज करण्यासाठी ऊसतोड, बांधकाम, वीटकामासाठी नागरिकांना हंगामी स्थलांतर करणे भाग झाले.
तालुक्यातील सोनमाळतांडाची उपजीविका कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. ९५ टक्के शेती निसर्गपावसावर आहे. कुटुंबसंख्या ८० पेक्षा अधिक आहे. दुष्काळाने शेतीची साथ मिळाली नाही. त्यामुळे जवळपास ७० % कुटुंब हंगामी स्थलांतरित झाली आहेत. अनेकांनी सोबतीला मुले घेऊन गेली आहेत. काहींनी वृद्ध माता-पित्यांना पशुधनाचा सांभाळ, मुलांच्या शिक्षणासाठी तांड्यावर ठेवले आहे. तालुक्यात नरेगातंर्गत कामे अत्यल्प चालू आहेत. सुमारे ४९० मजूर २९ कामावर असल्याचे समजते. कामे जलदगतीने व अधिक सुरु करण्याची मोठी उदासीनता आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर हंगामी स्थलांतरित होत आहेत.
सोनमाळतांड्याची जी स्थिती आहे. तशीच कमी अधिक प्रमाणात हिरामणतांडा, घणातांडा, ढाकूतांडा, रामातांडा, गणातांडा, रोहिदासतांडा, खेमातांडा, भोजूतांडा, गणपूरतांडा, दुर्गातांडा, उदातांडा, जयरामतांडा, रामानाईकतांडा, नरपटवाडीतांडा, पोमातांडा, रेखातांडा, वहादतांडा, दिग्रसतांडा, गुंटूरतांडा, महादेवमाळतांडा, लच्छमातांडा, हरिलालतांडा, गोविंदतांडा, बदुतांडा, गांधीनगर, राठोडनगर, लिंबातांडा, चोळीतांडा, केवळातांडा, महादेवतांडा, देवलातांडा, पटाचातांडा, घोडजतांडा, बाळांतवाडीतांडा, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडीतांडा, पांगरातांडा, लालवाडीतांडा, बाचोटीतांडा, हाळदातांडा, चौकीमहाकायातांडा, कांशीरामतांडा, नेहरूनगरतांडा, बोळकातांडा, शिराढोणतांडा वाडी गावात अशीच स्थिती स्थलांतरित नागरिकांची आहे.
तांड्यावर प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात पुन्हा निसर्गाने दगा दिला की, घरप्रपंचाचे गणित कोलमडते. त्या फाटक्या संसाराला शिवण्यासाठी अशी कसरत करावी लागते. प्रत्यक्ष तांड्यावरील चित्र अतिशय वेदनादायक असेच आहे. उन्हाळा अद्याप दूर असून आता अशी स्थिती आहे. दोन महिन्यानंतर तांडे, वाडी, गावे पाणीटंचाई व दुष्काळाने होरपळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बळीराजा काय म्हणतो ?
- गतवर्षी व यावर्षी दुष्काळाने जगणे कठीण केले आहे. रोजगार करण्यासाठी मुलगा व सून ऊसतोडणीसाठी गेले आहेत. माझे वय ८० असल्याने काम होत नाही. त्यामुळे मला येथे राहणे आवश्यक आहे. अन्यथा मी पण मुलासोबत गेले असते. दोन लेकरांचा सांभाळ करते. - केवळाबाई अंबादास पवार, (सोनमाळ तांडा, ता.कंधार)
- दिवसेंदिवस निसर्ग कोपत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडत असल्याने रोजगार हवा. मुलगा, नातू, नातसून परराज्यात ऊसतोडणीसाठी गेले. माझे वय ९० आहे. श्रमाचे काम होत नाही. घरसांभाळ, पशुधन सांभाळ करावा लागतो. पाणी प्रश्न आहे. त्यात विद्युत पुरवठा ही समस्या आहे. - तोलबा बदु जाधव (सोनमाळतांडा ता.कंधार)
- तालुक्यात दुष्काळाचे चटके भयावह आहेत. नरेगातंर्गत कामे सुरू करण्यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणा उदासीन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हंगामी स्थलांतरित होणे भाग पडत आहे. रोजगार, उद्योग, सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - उत्तम चव्हाण, (पं.स.सदस्य, कंधार )