Drought In Marathwada : मुखेड तालुक्याच्या दारावर दुष्काळाची थाप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:36 PM2018-10-29T12:36:44+5:302018-10-29T12:43:13+5:30
दुष्काळवाडा : मुखेड तालुक्यात २०१२ ते २०१८ या काळात ५१ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. तालुका चार वर्षापासून दुष्काळाने होरपळत आहे.
- दत्तात्रय कांबळे, मुखेड, जि. नांदेड
दुर्गम आणि डोंगराळ तालुका अशीच मुखेडची ओळख. अशी भौगोलिक पार्श्वभूमी लाभलेल्या या तालुक्याच्या अडचणीत पावसाने गेल्या चार वर्षांपासून आणखी भरच घातली आहे. यंदाही हे चित्र फारस समाधानकारक नाही. जेमतेम पाऊस. त्यामुळे नदी, नाल्यांसह धरणांत शेवटपर्यंत पाणी आलेच नाही. कसेबसे खरीप घेतल्यानंतर रबीचा पेराही घसरला. पिण्याच्या पाण्याच्या अडचणीबरोबर जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पावसाने पाठ फिरवलेल्या मुखेड तालुक्याच्या दारावर दुष्काळाने थाप दिली आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच तलावात ऐन पावसाळ्यात दहा टक्याच्या आत जलसाठा होता़ त्यामुळे आगामी काळात मुखेड तालुक्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण होणार आहे. खरीप पिकांबरोबर रबी पिकावर मोठा परिणाम झाला आहे़ तालुक्यात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून आॅक्टोबर महिन्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात २०१२ ते २०१८ या काळात ५१ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. तालुका चार वर्षापासून दुष्काळाने होरपळत आहे.
तालुक्यात फक्त ५८ टक्के पाऊस झाला़ या पावसात खंड पडल्याने पिके तगली, पण नदी, तलाव, विहिरीत पाणीसाठा झाला नाही. आतापासूनच उन्हाळा सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. काही गावांतून पंचायत समितीला टँकरची मागणी होत आहे. चारा-पाण्याच्या प्रश्नाबरोबरच तालुक्यात मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या शहरांकडे तसेच ऊसतोड काम, विटभट्टी कामासाठी स्थलांतर करू लागले आहे.
सोयाबीन, कापूस, ज्वारी, तुर, मूग, उडीद या खरीप पिकांवर पावसाआभावी व रोगांच्या प्रादूर्भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतात खर्च केलेले लागवडसुध्दा निघत नाही तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुग, उडीद, अत्यल्प उत्पादनामुळे शेतातून बाहेरच काढले नाही.
टंचाईबाबत बैठक
तालुक्यात उद्भवणारी पाणीटंचाईच्या बाबतीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पाणीटंचाई आराखडा आणि नियोजनसंदर्भात चर्चा करण्यात येईल. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न हाताळण्यासाठी तसेच विविध उपाययोजना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
- सी.एल.रामोड, गटविकास अधिकारी पं.स.मुखेड
बळीराजा काय म्हणतो?
- तालुक्यात शेतकरी खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात पिके घेतात. पण यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे खरीप रबी दोन्ही हंगामातील उत्पन्नावर परिणाम झाला. तलाव थोड पाणी आले पण, पिण्यासाठी राखून ठेवत वीज खंडित केल्यामुळे रबीची पिकेही कमी झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. - शिवशंकर पाटील कलंबरकर
- मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून, माळरान जमिनीच जास्त आहेत़ पाणी साठवण्याचे मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे मागील चार वर्षापासून पाऊस अत्यल्प व कमी उत्पादन यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. तर खरीपही गेले, रबीही गेली. यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ - नारायण चमकुरे, सावरगाव पी.
- माझी कोरडवाहू शेती असून पूर्वी शेतीत कामासाठी आम्ही गडी ठेवला होता. पण मागील चार ते पाच वर्षांपासून सतत दुष्काळ, नापिकी यामुळे लागवडीचा खर्चसुध्दा निघणे कठिण झाले आहे. आता मी स्वत:च शेतात काम करतो. नोकर ठेवणे परवडत नाही. अलीकडे शेतकऱ्यांना फार वाईट दिवस आलेले आहेत. चार वर्षात नदी-नाल्यांना पूर आलेला पाहिला नाही. - आण्णाराव कबीर, सावरगाव पी.