Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 03:50 PM2018-11-24T15:50:24+5:302018-11-24T15:51:46+5:30

दुष्काळवाडा : उमरी तालुक्यात आभाळमाया दूरावली आणि शेतकऱ्यांसह हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना हलाखीच जगणं नशिबी आलं.

Drought in Marathwada: Everything is like Summer; The Umari taluka is under the scanner of drought | Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात 

Drought In Marathwada : सगळा उन्हाळा झालायं; उमरी तालुका दुष्काळाच्या तडाख्यात 

Next

- बी. व्ही. चव्हाण, उमरी, जि. नांदेड 

महागमोलाचं बी, खत घेऊन पेरलं. बेभरवशी पावसाने नेमक्यावेळी पाठ फिरवली. कापूस उभाच वाळून गेला अन पल्हाट्या शिल्लक राहिल्या. फुलोऱ्यावर आलेले सोयबीनने माना टाकल्या. शेंगा लागल्याच नाहीत. पावसाविना बी-बियाणे, खताचा खर्च दूरच मशागतीचा खर्चही हाती लागला नाही. सगळा उन्हाळा झालाय. हे बोल आहेत, उमरी तालुक्यातील सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचे. निसर्गाच्या रोषाबरोबर त्यांना राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेली इथली माणसं येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगत आहेत. 

उमरी तालुक्यात आभाळमाया दूरावली आणि शेतकऱ्यांसह हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाना हलाखीच जगणं नशिबी आलं. त्यामुळेच या तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र तेलंगणाची सीमा असलेला हा भाग. सीमेलगत असलेल्या बोथी, तुराटी गावातील लोकाचं समजून घेण्यासाठी पोहोचलो. गावातील स्थिती दयनीय. माणसं  बोलू लागली. अगोदर पावसाचे प्रमाण मुबलक असे. त्यामुळे खरीप हंगाम गेल्यानंतर रबी हंगाम बऱ्यापैकी होई. चारा वैरणावर जनावरांचे पोषण होई. दूभत्या जनावरांमुळे येणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा चाले. आता सगळे संपल्यातच जमा आहे.

पावसाळा सुरू होतो न होतो, तोच पाऊस पाठ फिरवतो. आॅक्टोबर-नोव्हेंबरमधला परतीचा पाऊस फिरकतही नाही. खर्च करून पेरणी करायची. पण, पाण्याअभावी मशागतीचा खर्चही निघत नाही. उभी वाळून गेली. निसर्गाचा दुष्काळ आम्ही समजू शकतो. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा दुष्काळही आमच्याच वाट्याला का यावा हे समजत नाही, ही त्यांची व्यथा.  उमरी तालुक्याला इसापूर धरणाचे पाणी येत असले तरी तेही निसर्गावरच अवलंबून आहे. 

तुराटी गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर  तेलंगणाची सीमा आहे. तेलंगणामध्ये तेथील सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. त्या तुलनेत उमरी तालुक्यातील चित्र उलटच. उमरी या तालुक्याच्या गावाहून तुराटीपर्यतच्या १८ ते २० किमी अंतराला दोन तास लागतात. ही अवस्था गेल्या पन्नास वर्षापासून कायम आहे. 

बळीराजा काय म्हणतो?

गावात कापसाला पिशवीमागे अर्धा क्विंटलचा उतारा आला. सोयाबीनचे पीक आलेच नाही. आता पुढच्या हंगामापर्यंत जनावरे आणि घरची परिस्थिती कशी हाताळायची? घरात कुणी आजारी पडलं तर त्यांचा  औषध  पाण्याचा खर्च कसा करायचा असा प्रश्न पडला आहे.- मुकुंदराव सावंत, तुराटी

डोंगर माथ्यावर असलेल्या या भागात अनेक वर्षांपासून आमदार, खासदार कुणीही तोंड दाखवल नाही. तहसीलदार, बीडीओ , कृषी अधिकारी येत नाहीत. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ आम्हाला होत नाही. सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे आणि तुराटी येथील शेतकरी आत्महत्येच्या घटनेमुळे अनेक पुढारी इकडे भेटी देत आहेत. निदान आतातरी चोवीस तास वीजपुरवठा देऊन उपकार करावेत . 
- पिराजी मुडलोड 

शासनाने या भागाला कोरडवाहू गावे म्हणून मान्यता द्यावी. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना सहभागिता तत्वावर जलसंधारणाची कामे देण्यात यावी. मागेल त्याला विहीर देण्यात यावी. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे. त्यासाठी डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना बँकेकडून पीककर्ज देण्यासाठी प्राधान्य दिले जावे.
- गोविंद बजाज, कृषी पदवीधारक, बोथी.

उमरीपासून दूर असल्याने बोथी-तुराटी गावांच्या परिसराला स्वतंत्र महसूल मंडळाचा दर्जा देऊन तीव्र दुष्काळग्रस्त जाहीर करावे. त्या संदर्भाने सर्व सवलती व लाभाच्या योजना शेतकरी, मजुरदार व त्यांच्या कुटुंबियासाठी द्याव्यात. जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करावी. 
-लक्ष्मणराव सावंत, तुराटी

Web Title: Drought in Marathwada: Everything is like Summer; The Umari taluka is under the scanner of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.