दारुड्या पतीचा पन्नास हजारांसाठी त्रास, विवाहितेने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:35 PM2022-03-10T14:35:45+5:302022-03-10T14:35:45+5:30
विवाहितेला सासरच्या मंडळींकडून चार वर्षांपासून त्रास देण्यात येत होता.
नांदेड : दारूच्या आहारी गेलेल्या पतीने ऑटो घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणण्याची मागणी केली. त्याला सासरच्या इतर मंडळींनीही प्रोत्साहन दिले. नेहमी होत असलेल्या या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन २८ फेब्रुवारी रोजी आपले जीवन संपविले. या प्रकरणात उस्माननगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
कंधार तालुक्यातील बारूळ येथे मीना राजू शिरसे या विवाहितेला सासरच्या मंडळींकडून चार वर्षांपासून त्रास देण्यात येत होता. त्यात राजू शिरसे हा पती दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन तो ऑटो घेण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणण्याच्या मागणीसाठी त्रास देत होता. सासरच्या इतर मंडळींनीही तिला शिवीगाळ केली. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून मीना शिरसे यांनी गळफास घेतला. या प्रकरणात पांडुरंग कोंडीबा टोंपे यांच्या तक्रारीवरून राजू शिरसे, सुजाता बालाजी शिरसे, सुनीता भुजंग टोंपे, अनिता राहुल टोंपे यांच्या विरोधात उस्माननगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला..