नांदेडमध्ये मद्यपींची रस्त्यावरच रंगतेय ओली पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 07:47 PM2019-12-07T19:47:42+5:302019-12-07T19:50:35+5:30

ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच चढते भिंगरीची झिंग

Drunk party on the street in Nanded | नांदेडमध्ये मद्यपींची रस्त्यावरच रंगतेय ओली पार्टी

नांदेडमध्ये मद्यपींची रस्त्यावरच रंगतेय ओली पार्टी

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य नांदेडकर त्रस्त पोलिसांचेही होतेय दुर्लक्ष

नांदेड : शहरात असलेल्या वाईनशॉप आणि बिअर शॉपी परिसरातील रस्ते, मोकळ्या जागा आणि फुटपाथवरच राजरोसपणे मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत़ त्यातच भाग्यनगर आणि शिवाजीनगर ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच बिनदिक्कतपणे मद्यपी आपले बस्तान मांडून बसत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ त्यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे़ 

नांदेड शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यावर ठिकठिकाणी वाईन शॉप, देशी दारू दुकानांसह बिअर शॉपी आहेत़ जळपास सर्वच दारू दुकानांसमोर मद्यपींना भल्या पहाटेपासून झिंग चढत असल्याचे दिसून येत आहे़ सकाळी आठ वाजेपासूनच दारुच्या दुकानांसमोर मद्यपींची गर्दी पहायला मिळते़ तरोडा नाका भागात मालेगाव रस्ता, राज कॉर्नर येथे भाग्यनगर ठाण्याच्या परिसरात तसेच शेतकरी पुतळ्याच्या मागील बाजूस जंगमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील देशी दारुच्या दुकानांसमोर खुलेआम मद्य सेवन करताना मद्यपी आढळून येतात़ त्याचबरोबर शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, फुले मार्केट परिसरातही असेच चित्र पहायला मिळत आहे़ शिवाजीनगर येथून गोकुळनगर पोलीस चौकीकडे जााणाऱ्या रस्त्यासह नाना-नानी पार्क परिसरात ठिकठिकाणी मद्यपी राजसरोसपणे आपले बस्तान मांडून बसलेले असतात़ तर फुले मार्केट येथील चौक ते पोलीस ठाण्यापर्यंतचा फुटपाथवर ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर पोलिसांनाही न घाबरता पाणी पिल्यासारखे दारू पितांना मद्यपी दिसतात़ 

मद्यपींना ग्लासासह स्नॅक्सचीदेखील व्यवस्था वाईन शॉप चालकांकडून केली जात आहे़ त्यांना देशी दारू असो की इतर विदेशी मद्य घेतल्यानंतर ग्लास, खरमुरे इतर कोल्ड ड्रींकदेखील दुकानदार उपलब्ध करून देत आहेत़ मद्यपींना जागेवरच सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने रस्त्यावर दारू पिणाऱ्यांचेदेखील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे़ 

सामान्यांसह महिलांचीही होते कुचंबणा
शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती चौक, आनंदनगर चौक , मयूर मंगल कार्यालय परिसर, वाय पार्इंट, फुले मार्केट, पूर्णा रस्त्यावरील मोकळ्या जागा, कॅनॉल रस्ता, चैतन्यनगर रस्ता आदी ठिकाणी खुलेआम मद्यपींच्या पार्ट्या सुरू असतात़  त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना त्रास सहन करावा लागत आहे़ मद्यपीकडून भर रस्त्यावर लघुशंका केली जाते़ त्यामुळे परिसरातील महिलांची कुचंबणा होते़ तर अनेक ठिकाणी दारूच्या नशेत वाद घालून हाणामाऱ्याही होतात़ आनंदनगर ते शोभानगर या रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे़ आनंदनगर चौकातून शोभानगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपीसमोर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रस्त्यावरच वाहने उभी करुन फुटपाथवर मद्यपी आपले दुकान थाटत असतात. दारुच्या नशेत अनेकवेळा हाणामारीच्या घटना घडल्याने सर्वसामान्य नागरिकांत भीती आहे.

Web Title: Drunk party on the street in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.