शिक्षणाची कवाडे बंद झाल्यानेच मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:27 AM2018-09-05T00:27:00+5:302018-09-05T00:29:08+5:30
लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़
सुनील चौरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : लहानपणापासून एकत्रच खेळल्या, बागडल्या़ दोघींचे लग्नही एकाच मांडपात झाले़ सासरही एका गावातच़ असा दोघींच्या आयुष्यात विलक्षण योगायोग असलेल्या आत्या-भाचीने तीन दिवसांपूर्वी हदगाव तालुक्यातील सायाळवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली़ भाच्ची सीमा हिची लग्नानंतर शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा पूर्ण होत नसल्यामुळे तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत आत्या निकिता हिनेही मृत्यूला कवटाळले़
आत्या-भाचीच्या आत्महत्येमुळे सायाळवाडी हळहळली असून आता या प्रकरणातील एक-एक पैलू समोर येत आहेत़ आत्या निकिता राठोड व भाची सीमा राठोड यांचे एकाच दिवशी म्हणजे ७ मे २०१८ रोजी लग्न झाले होते़
लग्नापूर्वी त्यांनी सुखी संसाराचे स्वप्न रंगविले होते़ परंतु, सीमाला मात्र आपले शिक्षण पूर्ण करावयाचे होते़ नागपंचमीच्या दिवशी ती माहेरी धर्मापुरी (ता़ कंधार) येथे आली़ मनातील इच्छा तिने आईवडिलांसमोर बोलून दाखविली़ मात्र आईवडिलांना हे मान्य नव्हते़ ११ वीला प्रवेश घ्यावा, मात्र तिने घरी बसून परीक्षा द्यावी, असा पर्याय आईवडिलांनी सीमाला सुचविला़ मात्र हा पर्याय तिला मान्य नव्हता़ मला शिकू देत नसाल, तर मी आत्महत्या करते, असे तिने सांगितले होते़ परंतु तिचे बोलणे कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही़ अन् तिथेच घात झाला़ सीमा सासरी आली़, ती आत्महत्या करण्यासाठीच़ महालिंगी येथे आल्यानंतरही तिने आपल्या मनातील इच्छा गावातील शिक्षकांना बोलून दाखविली़ माझ्या आई-बाबांना सांगा, अशी विनंतीही तिने शिक्षकांना केली़ मात्र सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले अन् त्यातूनच दोन जिवांचा बळी गेला़
उत्कट प्रेमाचा करुण अंत
आत्या-भाचीच्या उत्कट प्रेमाचा शेवट करूण अंताने झाला़ या घटनेने सर्वांनाच स्तब्ध केले़ शिक्षण घेण्याची मनात इच्छा असूनही घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आपण शिक्षण घेऊ शकलो नाही़ ही सल सीमाच्या मनात होती़ मनाची झालेली ही कोंडी फोडण्यासाठी तीने पालकांपासून ते शिक्षकापर्यंत सर्वांसमोरच इच्छा प्रकट केली़ परंतु, कुणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सीमाने हे टोकाचे पाऊल उचलले़ तिला निकिता हिनेही साथ दिली़
तू गेल्यावर मी एकटी काय करु?
आत्महत्येची बाब सीमा हिने तिची आत्या निकिता हिलाही बोलून दाखविली़ आपण दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, शिक्षण एकत्र घेतले़ लग्नही एकाच मंडपात झाले़ दोघींचे सासरही एकाच गावात़ त्यामुळे तू गेल्यावर मी एकटी राहून काय करू? असा सवाल निकिताने सीमाला करून मीही आत्महत्या करते, असे सांगितले़ यावरून त्यांनी घटनेच्या दोन दिवसांपूर्वी तीन ते चार जागांची रेकी केली होती़ शेवटी सायाळवाडी शिवार निवडून २ सप्टेेंबर रोजी सकाळी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली़ आत्महत्या करण्यापूर्वी सहसा चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ मात्र या दोघींनी तसे काही केले नाही़ यातील निकिताने स्वत:च्या छातीवर बहिणीचा फोटो चिटकविला़ तर सीमाने कुटुंबियाचा फोटो चिटकवून एकाच झाडाला गळफास घेतला़
नाते आत्या, भाचीचे, जिवलग स्नेहाचे
मयत सीमा आणि निकिता राठोड या दोघी जिवलग मैत्रिणी़ निकिताला आईवडील नसल्याने ती भावाकडे म्हणजे सीमाच्या वडिलांकडेच राहत असे़ दोघीही एकत्र शिकल्या़ त्यांना शिक्षणाची आवड़ घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आई-वडिलांनी शिक्षण थांबवून दोघींना महालिंगी ताक़ळमनुरी येथे दिले़ दोघींचा विवाह ७ मे २०१८ रोजी एकाच मंडपात लागला़ महालिंगी गाव दुर्गम भागात आहे़ ना तिथे मोबाईलची रेंज, ना टीव्ही पाहण्याची सोय़ शेतात राबायचे, अन् रात्रीला जुन्या पद्धतीने गप्पाटप्पा करून झोपायचे़ असा दिनक्रम सीमा व निकिताचा लग्नानंतर सुरू झाला़ यातील सीमाने दहावीत ७६ टक्के गुण मिळवल्याने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा, महाविद्यालयात जावे, नियमित अभ्यास करून मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती़