बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात शेतमजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 06:54 PM2017-09-19T18:54:22+5:302017-09-19T18:55:40+5:30
वैरण घेवुन येत असतांना बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय शेतमजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ दि.18 रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजेसुमारास घडली.
लोहा (नांदेड ) दि.19 : वैरण घेवुन येत असतांना बैलगाडी उलटुन झालेल्या अपघातात एका बत्तीस वर्षीय शेतमजुराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ दि.18 रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजेसुमारास घडली. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
तालुक्यातील चितळी येथील शेतमजूर अनिल उमाजी जोंधळे (वय 32 ) आणि भारत गायकवाड हे सोमवारी हिप्परगा शिवारातून बैलगाडीत वैरण घेऊन चितळी गावाकडे परत येत होते. हिप्परगा नदीच्या पुलाजवळ येताच अचानक बैल बिथरल्याने बैलगाडी पलटी झाली.यावेळी भारत याने उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. मात्र, अनिल यांच्या पायाला अपंगत्व असल्यामुळे त्यांना उडी मारता आली नाही.
काहीच हालचाल करता न आल्यामुळे त्यांच्या अंगावर बैलगाडी अंगावर पडली. दरम्यान, अनिल यांना लोहा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक नंतर त्यांना नांदेडला हलविण्यात आले. तेथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले,त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा व आई-वडील असा परिवार आहे.अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने ते रोजगार करून संसारास हातभार लावत असत.