पाण्याचा ठणठणाट अन् निधी खर्चाचा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:21 AM2019-03-18T00:21:22+5:302019-03-18T00:25:01+5:30
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे़ रुग्णांसाठी दररोज किमान दहा ते बारा टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागतो़
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे़ रुग्णांसाठी दररोज किमान दहा ते बारा टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागतो़ असे असताना त्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी ढीम्म प्रशासनामुळे महाविद्यालय अन् रुग्णालयाचा जवळपास एक कोटींचा निधी परत जाणार आहे़ विशेष म्हणजे, कामे करण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया विभागच बंद करण्याचे पत्र प्रशासनाने काढले होते़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नांदेडसह शेजारील हिंगोली, परभणी, यवतमाळ, तेलंगणा आदी ठिकाणाहून दररोज हजारो रुग्ण येतात़ रुग्णालय व महाविद्यालयाचा आवाकाही आता वाढला आहे़ त्याचबरोबर रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे़ परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही रुग्णालयाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मागील वर्षी टँकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते़ यंदाही तोच कित्ता गिरविला जात आहे़ दररोज पाणी लागणाऱ्या महत्त्वाच्या विभागांमध्ये पाण्याचा तुटवडा आहे़ त्यामुळे काही वेळेला शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की येते़
दररोज रुग्णालयात दहा ते बारा टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ प्रत्येक टँकरमागे साधारणत: सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात़ गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे़ परंतु, प्रशासनाने याची साधी दखलही घेतली नाही़ तर दुसरीकडे टँकरने पाणी मागविण्यात येत असल्यामुळे केवळ शस्त्रक्रिया व इतर महत्त्वाच्या कामासाठीच त्याचा वापर केला जातो़
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी असलेल्या शौचालयांना पाणीपुरवठाच होत नाही़ त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना उघड्यावर शौचास जावे लागते़ पाणी नसल्यामुळे शौचालयांमध्ये दुर्गंधी सुटली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही़
या ठिकाणी असलेली विहिरही बुजविण्यात आली असून धर्मशाळा परिसरात असलेल्या बोअरला पाणी असताना केवळ जलवाहिनी टाकून ते पाणी रुग्णालयात आणण्यासाठीही दिरंगाई केली जात आहे़ दरवर्षी होणारी पाणीटंचाई लक्षात घेवून या ठिकाणीच दोन बोअर घेतल्यास हा पाणीप्रश्न सहज सुटू शकतो़ परंतु टँकरमाफियांच्या माध्यमातून अनेकांचे चांगभलं होत असल्यामुळे याकडे कानाडोळा करण्यात येत आहे़ त्यामुळे रुग्णालयातील दाखल रुग्ण आणि नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे़
शस्त्रक्रिया कक्ष बंद करण्याचे दिले होते पत्र
रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहेत़ जवळपास १३ मॉड्युलर ओटी आहेत़ मराठवाड्यात कोणत्याच शासकीय रुग्णालयात अशारितीने मॉड्युलर ओटी नाहीत़ परंतु दोन वर्षांतच या शस्त्रक्रियागृहांची वाईट अवस्था झाली़ जागोजागी फरशा उखडल्या आहेत़ प्लास्टर गळून पडले आहे़ परंतु, हे काम करण्यासाठी प्रशासनाने चक्क शस्त्रक्रिया कक्षच बंद ठेवण्याचे पत्र विभागांना दिले़ त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी याबाबत जाब विचारताच हा निर्णय मागे घेण्यात आला़
एक कोटी रुपये जाणार परत
वैद्यकीय व रुग्णालय प्रशासनाकडे विविध कामांसाठी जवळपास ५६ लाख तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४० लाख रुपयांचा निधी शिल्लक होता़ परंतु या निधीतून रुग्णालयात कामे करण्याऐवजी तो तसाच ठेवण्यात आला़ त्यामुळे आता आचारसंहिता आणि त्यात मार्च एण्ड असल्यामुळे उपलब्ध निधी खर्च होण्याची शक्यता कमीच आहे़ त्यामुळे हा एक कोटी रुपयांचा निधी परत जाणार हे निश्चित़