दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट
By admin | Published: October 22, 2014 01:21 PM2014-10-22T13:21:02+5:302014-10-22T13:21:02+5:30
यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
Next
मुखेड : यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत.
ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर पिके वाया गेली आहेत. यंदाची दिवाळी शेतकर्यांवर दुष्काळाचे सावट घेवून आली आहे. शेतकर्यांजवळ पैसा नसल्याने दिवाळीच्या सणातही बाजारात मंदी आली आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने पावसाळा झाला नाही. सरासरीपेक्षा केवळ ४0 टक्के पाऊस झाला. पेरणीच्या वेळी कसाबसा झालेल्या पावसानंतर चांगला पाऊस झाला नाही. कधीकधी आलेल्या पावसाच्या सरीवर पिके तग धरून होती.
पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पिकावर पैसा खर्च केला, पण परतीचाही पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली. खरीप पिकापाठोपाठ रबी पिकावर दुष्काळाचे सावट असून परतीचा पाऊस पडला नसल्याने रबी पिकेही घेणे कठीण आहे. उन्हाळ्यात पडते तसे उन पडत असून हिवाळ्यात गरमी होत आहे. शेतकरी चक्क नागवला असून शेतकर्यांच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. शेतकर्यांपाठोपाठ व्यापारी वर्गही अडचणीत आला असून शेतकर्यांजवळ पैसा नसल्याने बाजारपेठा ओसाड पडल्या आहेत. शेतकर्यांच्या जिवावर व्यवसाय करणारे कृषी दुकानदार, आडत दुकानदार आर्थिक अडचणीत आला आहे.
यावर्षी परिस्थिती गंभीर असून विहीर बोअर कोरडे पडले असून आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व पीक विमा मंजूर करून जनावरांसाठी चार्याची सोय करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. /(वार्ताहर)
■ खरीप हंगामात एकरी १0 क्विंटल उत्पन्न होणार्या शेतकर्यांना यंदा एकरी १0 पायलीही उत्पन्न मिळाले नाही. दाळी पुरतेही उडीद, मूगाचे उत्पन्न झाले नाही. सोयाबीन पीक शेंग पोकण्याअगोदरच (दाणा धरण्याअगोदर) सुकून गेले. ज्वारीच्या कनिसाची परिस्थितीही बिकट झाली. तर काही ठिकाणी ज्वारी पोटर्यात येण्याअगोदरच सुकून गेली, दिवाळीच्या काळात येणारे तुरीचे पिकेही करपून गेली. कापूस पिकाची परिस्थितीही तशीच आहे. यंदा शेतात घातलेल्या बी-बियाणाचे व खताचे पैसे निघणे अवघड झाले आहे.