भूकंपामुळे नांदेडकरांची पावसाळ्यात होणार झोपमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:52+5:302021-07-12T04:12:52+5:30
नांदेडात गेल्या अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जवळपास ४० वर्षांपूर्वी नांदेडला भूकंपाचा मोठा धक्का बसला, असे भूगर्भ शास्त्रज्ञ ...
नांदेडात गेल्या अनेक वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जवळपास ४० वर्षांपूर्वी नांदेडला भूकंपाचा मोठा धक्का बसला, असे भूगर्भ शास्त्रज्ञ सांगतात. साधारणत: उन्हाळ्यानंतर दोन ते अडीच महिने चांगला पाऊस झाल्यावर पाणी जमिनीत मुरल्यानंतर जमिनीत जी हवा दडलेली असते, ती बाहेर येते. त्यामुळे सौम्य धक्के जाणवतात. नांदेडात यापूर्वीही शिवाजीनगर, वजिराबाद, श्रीनगर, भाग्यनगर, काबरानगर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. विशेषत: कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास हे धक्के बसत असल्यामुळे अनेक दिवस या भागातील नागरिकांनी जागरण करून काढले होते. अनेकांनी तर रस्त्यावरच मुक्काम ठोकला होता. स्नेहनगर पोलीस कॉलनी भागात काही घरांना तडेही गेले होते. परंतु मोठे नुकसान झाले नव्हते. आता पुन्हा एकदा नांदेडात भूकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे.
रविवारी अनेक भागात सकाळच्या वेळी धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घाबरून न जाता अफवा पसरवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवा बाहेर निघण्याचा करते प्रयत्न
उन्हाळ्यात जमीन खूप मोठ्या प्रमाणात तापते. यावेळी जमिनीमध्ये हवा तयार होते. चांगला पाऊस झाल्यानंतर जेव्हा तो जमिनीत मुरतो, त्यावेळी ही हवा बाहेर निघते. त्यामुळेच हे धक्के जाणवत आहेत. काही ठिकाणी साधारणत: या धक्क्यांची तीव्रता दहा रिश्टर स्केलपर्यंतही असू शकते. परंतु त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नांदेडसह अख्ख्या महाराष्ट्रात भूर्गभात काळा पाषाण आहे. जवळपास ६५ मिलियन वर्षांपूर्वी ज्वालामुखीमुळे तो तयार झाला आहे. - प्रा. डॉ. दीपक पानसकर, भूशास्त्र विभाग, स्वारातीम विद्यापीठ
आतापर्यंत एक ते दीड कि.मी.चे क्षेत्र
नांदेडात जवळपास ४० वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला होता, तर काही वर्षांपूर्वी पहाटेच्या वेळी साडेतीन रिश्टर स्केलचा धक्का नोंदविण्यात आला होता. आजचा धक्का ४.४ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु मला नेमके त्याबाबत सांगता येणार नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर अशाप्रकारचे धक्के जाणवत असतात.
- डॉ. येडेकर