कोराेनामुळे स्मशानात आता राखीचेही झाले ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:16 AM2021-05-24T04:16:45+5:302021-05-24T04:16:45+5:30
नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. आतापर्यंत १,८०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ...
नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. आतापर्यंत १,८०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वयोवृद्धांपासून ते तरणेबांड आणि चिमुकल्यांचाही समावेश आहे. स्मशानभूमीत तर मृत्यूचे तांडव सुरू होते. अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग लागली होती, परंतु आता गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर थोडा-फार कमी झाला आहे, परंतु स्मशानात मात्र राखेचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे या ठिकाणचे कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.
कोरोनामुळे रक्ताची नाती गोठली आहेत. अनेक जण तर अंत्यसंस्काराला येण्यासही नकार देत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेक प्रेतांवर त्यांचे नातेवाईक बनून अंत्यसंस्कार करतात. तर जे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहतात, त्यातील बहुतांश नातेवाईक हे अस्थी घेण्यासाठीही येत नाहीत. या ठिकाणी त्या अस्थी काही दिवस सांभाळून ठेवल्या जातात. त्यानंतर, त्या गोदावरीत विसर्जित करण्यात येतात. त्याचप्रमाणे, कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात राख शिल्लक राहत आहेत. या राखेचा इतरांना त्रास होऊ नये, म्हणून राखेची महापालिकेकडून नियमितपणे विल्हेवाट लावली जाते.
गोवर्धन घाट स्मशानभूमी
शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी ही गोवर्धन घाट येथील आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या सर्वाधिक मयतावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एकुण १२ पिंजरे आहेत. कोरोनाचे मृत्यू वाढल्यानंतर सर्वच सर्व पिंजऱ्यांवर एकाच वेळी प्रेते जळत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राख निघत होती. एका मयतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, त्याच्या अस्थी गोळा करून लगेच राख उचलण्यात येत होती.
सिडको स्मशानभूमी
गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग लागल्यानंतर महापालिकेने काही मयतावर सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यावेळी नागरिकांनी विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली होती. या ठिकाणी शेकडो मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, परंतु त्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या.