नांदेडात रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे नातेवाईक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:22 AM2018-05-15T00:22:50+5:302018-05-15T00:22:50+5:30
वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात्यासह ब्लड बँकांमध्ये विनवण्या कराव्या लागत आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वाढत्या उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्याने रक्तदान शिबिरे होत नाहीत़ परिणामी नांदेडात रक्ताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना रक्तदात्यासह ब्लड बँकांमध्ये विनवण्या कराव्या लागत आहेत़
मराठवाड्यात औरंगाबादनंतर नांदेडात सर्वाधिक आरोग्य सुविधा मिळत असल्याने यवतमाळ, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील रूग्णांचा लोंढा नांदेडकडे असतो़ दररोज शेकडो रूग्ण भरती होतात़ शहरात नऊ ब्लड बँका असून येथून दररोज जवळपास पाचशे रक्त पिशव्यांची मागणी असते़ परंतु, सध्या रक्तदान शिबिरे होत नसल्याने आणि उन्हामुळे रक्तदाते समोर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडला आहे़
पाचशेवर रक्त पिशव्यांची मागणी असताना केवळ दोनशे ते तीनशे बॅग पुरविण्यात बँकांना यश येत आहे़ तर उर्वरित रूग्णांच्या नातेवाईकांना स्वत: रक्तदाता आणूनच रक्त मिळवावे लागत आहे़ शासनाने निर्धारित केलेल्या दरपत्रकानुसार प्लेन रक्त पिशवीसाठी १४५० रूपये, प्लेटलेट ४०० रूपये, प्लाजमा - ४०० रूपये तर एसडीपी - ११ हजार रूपये आकारले जातात़ परंतु, रक्त तुटवडा असल्याने श्री गुरू गोविंदसिंघजी ब्लड बँकेत रक्तदाता असल्याने प्लेन रक्त पिशवीसाठी केवळ ८५० रूपये घेतले जात आहेत़ रूग्णांच्या नातेवाईकांनी रक्तदानासाठी पुुढाकार घ्यावा यासाठी पिशवीमागे ६०० रूपये सवलत देत असल्याचे ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ़ प्रसाद बोरूळकर यांनी सांगितले़
सध्या या बँकेत पॉझिटीव्ह ग्रुपच्या बोटावर मोजण्याएवढ्या पिशव्या उपलब्ध आहेत़ तर निगेटीव्ह रक्तदाते तर मिळणे दुरापास्तच झाले आहे़ अशीच स्थिती नांदेड ब्लड बँकेची असून बोटावर मोजता येतील एवढ्या रक्तपिशव्या असून त्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचे बँकेचे संचालक स्वामी यांनी सांगितले़ दरम्यान, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना प्राधान्य देवून मोफत रक्त दिले जाते, असे डॉ़बोरूळकर यांनी सांगितले़
थॅलेसेमिया रूग्णांच्या पालकांची धावपळ
उन्हामुळे रक्तदात्यांची संख्या घटली़ याचा सर्वाधिक परिणाम थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांवर होत आहे़ त्यांचे हिमोग्लोबिन तीन ते चारवर येवून ठेपत आहे़ वेळीच रक्त उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जिवास धोका होवू शकतो़ त्यामुळे पालकांनी पुढाकार घेवून सोसायटीमार्फत रक्तदात्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून रक्तदान करण्याची विनंती केली जात आहे़ परंतु, अपेक्षेप्रमाणे रक्तदाते पुढे येत नसल्याने थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांचे नातेवाईक हतबल होत असल्याचे पालक बसवंत नरवाडे यांनी सांगितले़
दोन दिवसांत केवळ एकाचे रक्तदान
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात जवळपास २५० रूग्ण थॅलेसेमियाग्रस्त असून त्यांना दर पंधरा ते वीस दिवसाला रक्त द्यावे लागते़ शासनाकडून त्यांना मोफत रक्त देण्याची सुविधा उपलब्ध आहे़ परंतु, काही बँका जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात़ त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांच्या पालकांनी एकत्रित येवून थॅलेसेमिया सोसायटीची स्थापना केली असून त्यांच्याकडून जुन्या शासकीय रूग्णालयात ११ ते १५ मे या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजिले होते़ परंतु, दोन दिवसांत केवळ एका रक्तदात्याने रक्तदान केल्याने येथील कॅम्प बंद करण्यात आला असून नेहमीप्रमाणे शासकीय रूग्णालयातच ऐच्छिक रक्तदात्यांचे रक्त घेतले जात आहे़ रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे़