दमदार अभिनयामुळे ‘द इंटरव्ह्यू’ ने प्रेक्षकांना ठेवले खिळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:33 AM2018-02-07T00:33:45+5:302018-02-07T00:35:08+5:30
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाट्यकृतीचा नांदेडकरांना आस्वाद मिळत आहे. स्पर्धेच्या तिसºया दिवशी नवी मुंबईच्या कलाकारांनी सादर केलेले ‘द इंटरव्ह्यू’ हे नाटक लक्षणीय ठरले. प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्यास सादरकर्ते यशस्वी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत एकापेक्षा एक सरस नाट्यकृतीचा नांदेडकरांना आस्वाद मिळत आहे. स्पर्धेच्या तिसºया दिवशी नवी मुंबईच्या कलाकारांनी सादर केलेले ‘द इंटरव्ह्यू’ हे नाटक लक्षणीय ठरले. प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्यास सादरकर्ते यशस्वी झाले.
येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात श्री शिव समर्थ युनिव्हर्सल असोसिएशनच्या वतीने रमाकांत जाधव दिग्दर्शित आणि मिहीर गोलतकर आणि रमाकांत जाधव यांनी मराठीत रुपांतरित केलेले हे मूळ नाटक सिद्धार्थकुमार यांचे आहे. रंगमंचावर हे नाटक तितक्याच प्रभावीपणे सादर झाले. नाटकात कार्पोरेट जगतातील ताणतणाव, एकमेकांवरील कुरघोडी याबरोबरच आपले स्थान कायम ठेवण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वाट्टेल ते काम करण्याची तयारी आणि त्यातून झालेला खून यामुळे हे नाट्य धीरगंभीरपणे रंगले.
उपस्थित प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीत बसून होता. दरम्यान, दुपारी चार वाजता खाजा अहमद अब्बास आणि सआदत हसन मंटो यांच्या कथेवर आधारित ‘आणि शेवटी प्रार्थना’ हे नाटक सादर झाले. रुपेश पवार यांनी नाट्यरुपांतर आणि दिग्दर्शन केलेल्या व राष्ट्रभाषा परिवार सामाजिक व सांस्कृतिक संस्था नागपूर यांच्या वतीने सादर झालेल्या या नाटकात पहिल्या अंकात एक आणि दुसºया अंकात आणखी एक अशी दोन नाट्य रंगतात.
सआदत हसन मंटोचे कथानक हे इनायत नावाच्या मुलीभोवती रंगते. इनायत ही आपल्या उदरनिर्वाहाकरिता टांगा चालविते. परंतु टांगा चालविणे म्हणजे पुरुषांच्या हद्दीत येणे. कारण टांगा चालविण्याचा अधिकार स्त्रियांना नाही आणि घडतेही या मानसिकतेप्रमाणेच.
केवळ स्त्री म्हणून तिला टांगा चालविण्याचा परवाना मिळत नाही, परंतु नंतर तिला वेश्या व्यवसायाचा परवाना मिळतो. या नाटकाच्या माध्यमातून समाजाची स्त्रिया विषयीची विचारश्रेणी मांडण्यात आली आहे.
कोणतीही स्त्री स्वेच्छेने कधीच वेश्यावृत्ती स्वीकारत नाही. तर समाज तिला त्या मार्गाने जाण्यासाठी परिस्थिती निर्माण करतो. याच नाटकाचे दुसरे कथानक समाजाचा विद्रूप चेहरा समोर आणणारे आहे. गलिच्छ झोपडपट्टीत राहणारा चित्रकार सुंदर चित्र काढून नेहमी स्वत:ला वास्तविकतेपासून दूर ठेवतो. मात्र त्याच्या चित्रात जेव्हा सत्यता येते तेव्हा समाजाचा अक्षरश: पाया हादरल्याचे मांडण्यात आले आहे. या नाटकात २३ कलावंतांनी भूमिका साकारली. प्रेक्षकांनीही कलाकाराच्या अभिनयाला उत्स्फूर्त दाद दिली. नाट्यस्पर्धेला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़