अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार
By श्रीनिवास भोसले | Published: June 8, 2023 03:09 PM2023-06-08T15:09:20+5:302023-06-08T15:11:40+5:30
नाईट लँडींगसह नियमीत विमानसेवेसाठी घेणार पुढाकार; उद्योगमंत्री उद्या सामंत यांचा पुढाकार
नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे येथील विमानतळासंदर्भातील प्रश्न पुढे आले आहेत. नांदेड विमानतळाचे लायसन्स रद्द केल्याने नाईट लँडींग कशी करणार असा प्रश्न उद्भवला होता. त्यामुळे तत्काळ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड गाठत विमानतळाची पाहणी करून प्रशासनाची बैठक घेतली.
नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मोदी महा जनसंपर्क अभियान देशभर राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील या अभियानाची सुरुवात नांदेड येथून १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जाहीर सभेने होणार आहे. सायंकाळी ५ वाजेची सभा आटोपून अमित शाह हे पुन्हा गुजरातकडे रवाना होणार आहेत. परंतु नांदेड विमानतळावरून नाईट लँडींगची सुविधा बंद करण्यात आली आहे. याबाबतचे लायसन्स रद्द केल्याने नियमाने अमित शाह यांचे विमान रात्रीला टेक ऑफ करू शकणार नाही, त्यामुळे शाह यांच्या दौऱ्यात काही बदल करता येतील का या अनुषंगानेही स्थानिक भाजप पुढाऱ्यांनी प्रयत्न केले. परंतु त्यास यश आले नाही. या नियोजीत दौऱ्यात व्यत्यय येवू नये म्हणून आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही धावपळ सुरू झाली आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ नांदेडला धाव घेत गुरुवारी दुपारी विमानतळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
विमानतळ पुन्हा एमआयडीसीकडे घेण्यासाठी प्रयत्न
विमानतळाची परिस्थिती पाहून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकाऱ्यांना धारेवर धरत विमानतळ पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी नांदेडकरांना दिले. आजघडीला विमानतळ रिलायन्सकडे असून तेथील अनेक बिले थकली आहेत. सुरक्षेचा प्रश्नही गंभीर आहे. या अनुषंगाने स्थानिक नेत्यांनी तक्रारी केल्या. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त नाईट लँडींग सुरू करण्यासाठी सामंत यांच्याकडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. शाह यांच्या दौऱ्यात कुठलाही अडथळा येणार नाही, नाईट लँडींग सुरू होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातही विमानतळ पूर्ववत सुरू करण्याबरोबरच काही शहरातील विमानसेवाही सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन उद्योगमंत्री सामंत यांनी दिले. त्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न आता शाह यांच्या दौऱ्यानिमित्ताने सुटणार असे चित्र दिसत आहे.