कुशल कामगारांची कमतरता, यावर्षी राष्ट्रध्वजाचे उत्पादन घटले
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: August 3, 2024 08:01 PM2024-08-03T20:01:46+5:302024-08-03T20:02:12+5:30
रॉ मटेरियलचा पुरवठा झाला उशिरा, बुकिंगही कमी झाले
नांदेड : जिल्ह्यासह देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाकडून दरवर्षी लाखों राष्ट्रध्वज तयार करून ते देशातील विविध राज्यात विक्री केले जातात. दिल्ली येथील लालकिल्ल्यावरही नांदेडचाच तिरंगा फडकतो. परंतु, यावर्षी मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाकडे राॅ मटेरियलचा पुरवठा उशिरा झाला असून कुशल कामगारांचीही कमतरता आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रध्वजाच्या उत्पादनात ३० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.
येथील खादी ग्रामोद्योग मंडळात तयार केलेले राष्ट्रध्वज देशातील विविध भागांत फडकतात. येथे २१ फुटांपर्यंत राष्ट्रध्वज तयार केले जातात. दरवर्षी एक कोटीहून अधिक राष्ट्रध्वजाची विक्री होते. गतवर्षी येथील खादी मंडळाने ७५ लाखांचे राष्ट्रध्वज विक्रीचे उद्दिष्ट ठेवले होते. तर ५० लाख रुपयांचे राष्ट्रध्वज विक्री करण्यात आले. यावर्षी अजूनही म्हणावी तितकी राष्ट्रध्वजाची मागणी आलेली नाही. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची वर्षाकाठी १५ ते २० कोटी रुपयांची उलाढाल होते. राजकीय पुढारी तसेच तरुणाई यासह शाळा, महाविद्यालयांमध्ये आजही खादीचा वापर केला जातो. नांदेड शहरातच खादी कपड्यांची वर्षाकाठी एक ते दीड कोटी रुपयांची विक्री होते.
मराठवाड्यात चार मुख्य उत्पादन केंद्र
मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाचे मराठवाड्यातील कंधार, उदगीर, औसा व अक्कलकोट हे चार मुख्य राष्ट्रध्वजाचे उत्पादन केंद्र आहेत. या केंद्राअंतर्गत एकूण ६०० कुशल कारागीर काम करतात. परंतु, खादी मंडळापेक्षा शेतीकामे व अन्य कामात जास्त मजुरी मिळत नसल्याने यंदा २५ ते ३० टक्के कामगारांनी बाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे काम करणारे कर्मचारी कमी झाले आहेत. त्याचा परिणाम राष्ट्रध्वज निर्मितीवर झाला आहे.
१५ दुकानांत झेंडे विक्रीसाठी ठेवणार
मराठवाड्यातील खादी ग्रामोद्योग मंडळाची विविध शहरांत १५ दुकाने आहेत. या दुकानांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी ठेवण्यात येतात. गतवर्षी राष्ट्रध्वज तयार करणे आणि सूत कताई व विणकाम करण्यासाठी नियमित ५०० ते ६०० महिला काम करीत होत्या. पण यंदा राष्ट्रध्वज शिलाईसाठी कुशल कामगारांची कमतरता असल्याने निर्मितीवर परिणाम झाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा किमान ३० टक्के राष्ट्रध्वजाचे उत्पादन कमी झाले आहे.
कर्नाटक, केरळमधून येते रॉ मटेरियल
मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाकडे कर्नाटक व केरळ राज्यातून कच्चा मालाचा पुरवठा होतो. त्यात पोनी (सूत) सह अन्य सामुग्री वेळेवर न मिळाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात वनाई व सूत कताईसाठी मजुरांना गुंडीवर एक हजार मीटर मजुरी दिली जाते. पण सध्या शेतीकामे सुरू असल्याने शेतीकामासाठी जास्त मजुरी मिळत असल्याने कामगारांची संख्या कमी झाली आहे.