महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड, सत्ताधाऱ्यांना मात्र झाला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:01+5:302021-09-24T04:22:01+5:30
महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी ...
महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका या प्रभाग पद्धतीनेच झाल्या होत्या. त्याचा चांगला लाभ काँग्रेसला झाला होता. परिणामी आगामी काळातही प्रभाग पद्धतीनेच मनपा निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसने जाहीरपणे केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल असे सांगितले होते. तो निर्णय आता महाविकास आघाडी सरकारने फिरवला आहे.
पालिकेतील सध्याची स्थिती
महापालिकेत सध्या काँग्रेसचे एकहाती बहुमत आहे. भाजपाचे ६, सेना १, अपक्ष एक असे संख्याबळ आहे. प्रभाग पद्धतीचा लाभ घेत काँग्रेसने आपल्या दुबळ्या उमेदवारांनाही विजयापर्यंत खेचून आणण्याची किमया साधली आहे.
आता अशी असेल पालिकेतील स्थिती
यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांचा अनुभव गाठीशी असल्याने प्रभाग पद्धतीत विजयाचे गणित कसे साधायचे याची रचना काँग्रेसकडे तयार असते. इतर पक्षही आता आपले संख्याबळ वाढविण्यासाठी कामाला लागणार आहेत.
एका मतदाराला तिघांना द्यावे लागणार मत
महापालिका निवडणुकीत यापूर्वी एका प्रभागात दोन आणि त्यानंतर तर ४ उमेदवारांना नांदेडकरांनी मतदान केले आहे. आता एका प्रभागात तीन उमेदवार निवडायचे आहेत. प्रभाग पद्धती नांदेडकरांसाठी नवी नाही.
शहराच्या विकासाला बसणार खीळ
प्रभाग रचनेमुळे नगरसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. विकासकामे खोळंबली आहेत. मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
-अब्दुल शफीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
वाॅर्ड पद्धतीने आपल्या वाॅर्डाचा विकास साधता आला असता. सर्व काही वाॅर्डासाठी अशी परिस्थिती राहिली असती.
-प्रशांत इंगोले, वंचित बहुजन आघाडी
राजकीय अपेक्षांवरही पाणी
प्रभाग पद्धतीमुळे नगरसेवकांची जबाबदारी निश्चित होत नाही. त्यामुळे वाॅर्ड पद्धतीने निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती.
-तुलजेश यादव, सेना
प्रभाग पद्धतीने नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. वाॅर्ड पद्धतीने ती टाळता आली असती.
-दीपकसिंह रावत, भाजपा
अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
-जीवन घोगरे, राष्ट्रवादी
प्रभाग पद्धतीने वाॅर्डांचा विकास साधता येतो. एकत्र येऊन निधी मिळवता येतो. प्रभाग पद्धती योग्यच आहे. -वीरेंद्रसिंघ गाडीवाले, काँग्रेस.