बोंडअळीमुळे कंधार तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील पांढरे सोने झाले बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:14 PM2017-12-08T18:14:20+5:302017-12-08T18:14:46+5:30
६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़
कंधार (नांदेड ) : तालुक्यात ६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़
कंधार, कुरुळा, फुलवळ, बारूळ, पेठवडज, उस्माननगर या ६ महसूल मंडळात शेतक-यांनी ६६ हजार १०२ हेक्टरवर खरीप पेरणी केली़ त्यात कापूस, सेयाबीनची लागवड सर्वात जास्त होती़ त्यात १२ हजार ५७ शेतकºयांनी १७ हजार २२५ हेक्टरवर कापसाची लागवड केली़ सुरुवातीला अत्यल्प पर्जन्यामुळे वाढीवर परिणाम झाला़ आणि आता वेचणीचा हंगाम सुरू झाल्यावर बोंडअळीची लागण झाली़ कोरडवाहू शेती व बागायती शेतीतील कापूस उतारा प्रचंड घटला़ शेतकरी हवालदिल झाला़ बोंड अळीने फुले, बोंडे, पाते नाहीसे केले़ थोडासा कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी करावी लागली़ परंतु या अळीचा प्रादुर्भाव मजुराच्या शरीरावर खाजेद्वारे होण्याची भीती असल्याने ते ही धास्तीने ग्रासले आहेत़ त्यामुळे वेचणीचा भाव वधारला आहे़ पण खर्च आणि उतारा याचा ताळमेळ बसत नाही़ आणि शेतक-यांनी अनेक गावांत कापसात जनावरे सोडली़ अखेर शेतक-यांनी नुकसान भरपाईसाठीची मागणी केली़
कापूस अधिनियमातील तरतुदीनुसार तक्रारीचा सूर वाढला़ तक्रार अर्जासोबत कापूस बियाणाचे बिल, पिशवी, सातबारा आदी देणे भाग आहे़ अर्जानंतर मंडळ कृषि अधिकारी तथा बील निरीक्षक पाहणी करत आहेत़ एच फॉर्ममध्ये सर्व माहिती भरत आहेत़ आय फॉर्ममध्ये जिल्हास्तरीय समिती गावोगाव भैट देवून रँडम पद्धतीने हे काम चालू आहे़ त्यात कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे डॉ़ढोक, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड व मंडळ कृषि अधिकारी गावोगाव जाऊन अहवाल तयार करत आहेत. १२६ महसुली गावे, वाडी तांड्यावरील शेतक-यांपैेकी १०६ गावातील अर्ज प्राप्त झाले आहेत़ त्यानुसार बारूळ, कौठा, उस्माननगर, लाठ खु़, पेठवडज, गोणार, आंबुलगा, हरबळ, घोडज, शेकापूर, गंगनबीड, नागलगाव, कुरुळा आदी गावातील आय फॉर्म भरणे चालू आहेख़रीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे खरेदी बील, पिशवी कुठे ठेवले? याची शोधाशोध शेतकरी करत आहेत़ अनेकांना हे सापडत नाहीत़ त्यामुळे अडचणीत मोठी भर पडत आहे़ त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, असा सूर शेतक-यांत उमटत आहे.
बाधित कापूस क्षेत्राची पाहणी सुरू
बोंडअळी बाधित कापूस क्षेत्राची पाहणी केली जात आहे़ प्राप्त अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल़ बोंड अळी नियंत्रणासाठी डिसेंबर अखेर नांगरटी खोल करून घ्यावे़ त्यामुळे अळीचे अवशेष नष्ट होतील़ आणि पुढील वर्षी अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल़ शेतक-यांनी असे केल्यास अळीला पायबंद बसेल
- संजय गायकवाड, तालुका कृषी अधिकारी, कंधाऱ