भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून १५ लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 07:28 PM2021-05-10T19:28:19+5:302021-05-10T19:29:11+5:30
पोलिसांनी या रस्त्यावरील अनेक दुकानांतील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
नांदेड : बंदुकीचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याकडून १४ लाख ८० हजार रुपये असलेले बॅग लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिंगोली गेट ओव्हरब्रीजवर घडली. भरदिवसा घडलेल्या लुटीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील नवा मोंढा येथील योगेश मार्केटिंगचे मालक ओम बोरलेपवार हे बॅगेत १४ लाख ८० हजार रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी चिखलवाडी कॉर्नर येथे जात होते. त्यांची दुचाकी हिंगोली गेट उड्डाणपुलावर आली असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांची दुचाकी अडविली. यावेळी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून घेतली. बोरलेपवार यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आली. घटनेनंतर चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोनि.जगदीश भंडरवार, द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या रस्त्यावरील अनेक दुकानांतील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. याप्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चौकातील कॅमेरे बंदच
सेफ सिटी योजनेअंतर्गत नांदेड शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु देखभाल आणि दुरुस्ती नसल्यामुळे यातील अनेक कॅमेरे बंदच आहेत. त्यामुळे चाेरट्यांचे फावत आहेत. भरदिवसा घडलेल्या या लुटीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र दहशत आहे.