डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कामे अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:31 AM2018-09-08T00:31:46+5:302018-09-08T00:32:12+5:30
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा गाडा हाकावा लागत असल्यामुळे प्रशासनाची मात्र मोठी पंचाईत होत आहे़ याबाबत रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला पत्र पाठविले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा गाडा हाकावा लागत असल्यामुळे प्रशासनाची मात्र मोठी पंचाईत होत आहे़ याबाबत रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला पत्र पाठविले आहे़
सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या गाजत असलेल्या विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत आला आहे़ नको त्या ठिकाणी रस्ते करुन निधीचा अपव्यय करण्यात या विभागाचा हातखंडा आहे़ परंतु, स्थलांतरण होवून तीन वर्षे लोटली तरी या ठिकाणच्या अनेक कामांना अद्याप मुहूर्तच लागला नाही़ २० आॅक्टोबर २०१५ रोजी विष्णूपुरी येथे रुग्णालय सुरु करण्यात आले होते़ तेव्हापासून येथील प्राथमिक व अत्यावश्यक कामांची अवस्था ‘जैसे थे’ च आहे़
रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची दुरुस्ती, आंतररुग्ण विभागात पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, स्वच्छता, रंगरंगोटी, आंतररुग्ण विभागाच्या इमारतीतील खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविणे, जीवरसायनशास्त्र विभागाची दुरुस्ती, झेंडावंदन परिसराची दुरुस्ती, रुग्णालय बाह्यरुग्ण विभागात स्वच्छता, पीएसएम व उपहार गृहाची दुरुस्ती, पार्कींग शेड, ट्रॅफीक बॅरिकेटची दुरुस्ती, शस्त्रक्रिया विभागातील फ्लोरींगची दुरुस्ती यासह अनेक कामे प्रलंबित आहेत़ त्यासाठी जवळपास ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे़
परंतु अद्यापही या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने हात लावला नाही़ याबाबत प्रशासनाकडून अनेकवेळा पाठपुरावा करण्यात येतो़ परंतु बांधकाम विभागाकडून प्रशासनाच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात येते़
गतिरोधक नसल्यामुळे अपघात- रुग्णालयात दररोज शेकडो वाहने येतात़ अधिष्ठातांचे कार्यालय, विद्यार्थी वसतिगृह हे सर्व एकाच रस्त्यावर आहे़ याच रस्त्यावरुन विद्यापीठातील विद्यार्थीही येतात़ परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहेत़
दोनच दिवसापूर्वी विद्यार्थ्यांच्या वाहनांचा अपघात झाला़ होता. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे, अशी मागणी प्रशासनाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे़