रुग्णालय स्वच्छतेसाठी ई-टेंडरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:56 AM2019-02-09T00:56:34+5:302019-02-09T00:58:20+5:30

विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवक नसल्यामुळे सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दखल घेतली असून रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केली़

E-Tandoori for the hospital cleanliness | रुग्णालय स्वच्छतेसाठी ई-टेंडरिंग

रुग्णालय स्वच्छतेसाठी ई-टेंडरिंग

Next
ठळक मुद्देसोनोग्राफी सेवा सुरळीत शासकीय रुग्णालयाला किमान १०० कर्मचारी मिळणार

शिवराज बिचेवार।

नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवक नसल्यामुळे सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दखल घेतली असून रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी चर्चा केली़ तसेच येत्या काही दिवसांत रुग्णालय स्वच्छतेसाठी ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन दिले़ त्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा ताण हलका होणार असून प्रत्येक कक्षाला आता कर्मचारी मिळणार आहे़
डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळसह शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणातून दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात़ यामध्ये अत्यवस्थ रुग्णांचाही अधिक भरणार असतो़ परंतु या ठिकाणी असलेल्या ३६ कक्षांसाठी २४६ सेवक आहेत़ या सेवकांवरच रुग्णालय स्वच्छतेची जबाबदारी आहे़ त्यामुळे सेवकांची ही संख्या अपुरी पडत होती़ रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यापासून या ठिकाणच्या स्वच्छतेचे काम ई-टेंडरिंग करुन कंपनीला द्यावे, अशी मागणी जोर धरत होती़ परंतु याकडे दुर्लक्षच करण्यात आले़ त्यामुळे रुग्णालय स्वच्छतेबरोबरच कक्षातही सेवक उपलब्ध नसल्यामुळे रुग्णसेवा प्रभावित होत होती़
तीन दिवसांपूर्वी कक्षात सेवक नसल्यामुळे सोनोग्राफी केंद्राला टाळे ठोकण्यात आले होते़ त्यामुळे सोनोग्राफीच्या तपासणीसाठी कक्षाबाहेर थांबलेल्या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागले होते़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ़वाय़एच़चव्हाण यांना बोलावून घेतले होते़ यावेळी डॉ़ चव्हाण यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे असल्याचा मुद्दा उपस्थित केला़ त्यावर जिल्हाधिकाºयांनी येत्या काही दिवसांत स्वच्छतेच्या कामाचे ई-टेंडरिंग करुन खाजगी व्यक्तीला देण्याचे सुतोवाच केले़ या निर्णयामुळे रुग्णालयाला स्वच्छतेसाठी किमान १०० कर्मचारी मिळणार आहेत़ त्यामुळे रुग्णालयात कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांवरील ताण कमी होणार असून प्रत्येक कक्षालाही हे कर्मचारी उपलब्ध होतील़
दिवसाकाठी ५० हून अधिक तपासण्या
रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्रात दिवसाकाठी ५० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात़ त्यामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची संख्या अधिक असते़ त्याचबरोबर पोटासह इतर शस्त्रक्रियांसाठीच्या रुग्णांचाही समावेश असतो़ परंतु, किरकोळ कारणावरुन हा विभाग बंद ठेवण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले होते़ त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती़ अनेक रुग्णांना तर दहा किमीचा प्रवास करुन नांदेड शहरात या तपासणीसाठी यावे लागत होते़
वैद्यकीय अधीक्षकांनी कर्मचा-यांना घेतले फैलावर
‘लोकमत’च्या वृत्तानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ़ चव्हाण यांनी सोनोग्राफी केंद्रातील डॉक्टर व सेवकांना फैलावर घेतले़ कोणतेही कारण असो विभाग बंद का ठेवण्यात आला ? विभाग बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली याबाबत डॉ़चव्हाण यांनी जाब विचारला़ तसेच यापुढे केंद्रात प्रत्येकवेळी सेवक उपलब्ध राहील याप्रमाणे वेळापत्रक तयार करुन दिले़

Web Title: E-Tandoori for the hospital cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.