विष्णूपुरीत पाण्याची आवक सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:28 AM2018-06-12T00:28:28+5:302018-06-12T00:28:28+5:30
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येपासूनच दमदार आगमन झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवाही सुरुच आहे. प्रकल्पात सद्य:स्थितीत ३० दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून प्रकल्प ३६ टक्के भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येपासूनच दमदार आगमन झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवाही सुरुच आहे. प्रकल्पात सद्य:स्थितीत ३० दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून प्रकल्प ३६ टक्के भरला आहे.
शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात यंदा नांदेडकरांसाठी डिग्रस, लोअर दूधना तसेच सिद्धेश्वर प्रकल्पांतूनही पाणी घेण्यात आले होते. त्यामुळे नांदेडकरांची तहान भागली गेली.
मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येलाच पावसाचे आगमन झाले. मागील चार दिवसांत जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १७१.२० मिमी पाऊस झाला आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात २९.८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. ३६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी आता नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शनिवारी व रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे आसना नदी ओसंडून वाहत आहे. परिणामी आमदुरा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे.
तरोडा भागातील सर्वच रस्ते चिखलमय
पावसामुळे नांदेड शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर बहुतांश रस्ते चिखलमय झाले़ यामध्ये तरोडा भागात ड्रेनेजची कामे पूर्ण केल्यानंतर सिमेंट काँक्रिट करण्यात आले नाही़ त्यामुळे या भागातील सर्वच रस्ते चिखलमय झाल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ जेएनएनयुआरएमअंतर्गत शहरातील ड्रेनेजलाईन व पाणीपुरवठ्याची कामे करण्यात आली़ तरोडा भागासाठी कोट्यवधींचा निधी खर्चून रस्त्याची कामे करण्यात आले़
त्यानंतर दुसºया टप्प्यात ६६ कोटी रूपयांची ड्रेनेजलाईन मंजूर झाली होती़ या निधीतून तरोडा भागातील सरपंचनगर, सिंचननगर, राजगडनगर, स्नेहांकित कॉलनी, सिद्धांतनगर, तथागतनगर, बोधीसत्वनगर, जैन मंदिर परिसर आदी नगरांमध्ये पाणीपुरवठा तसेच ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले़ यापूर्वी काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते़ परंतु, पाईपलाईन व ड्रेनेजलाईन अशा दोनवेळी रस्ते खोदण्यात आले़ त्यामुळे सर्वत्र खड्डेच खड्डे झाले होते़ सिमेंटचा रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी या भागातील नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी केली होती़
‘पाणीपुरवठ्याच्या नियोजनात बदल नाही’
शहरात आजघडीला दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरु आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल केला जाणार नाही, असे आयुक्त लहुराज माळी यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे नियोजन विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कोलमडले आहे. काबरानगर पपींग स्टेशन तसेच कोटीतीर्थ पपींग स्टेशन भागात वादळीवाºयाने झाडे विजेच्या तारावर पडली परिणामी वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे. विष्णूपुरी पाण्याचा येवा सुरुच आहे. प्रकल्पात समाधानकारक जलसाठा उपलब्ध झाल्यानंतर पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याबाबत विचार होईल, असे सांगण्यात आले.