१४ हजारांवर बालकांना सकस आहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:31 AM2018-12-01T00:31:42+5:302018-12-01T00:35:12+5:30
गरोदर स्त्रिया, स्तनदा माताना चौकस आहार व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा १४ हजार ४७९ बालकांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे
किनवट : तालुक्यातील आदिवासी उपयोजना टीएसपीअंतर्गत १२१ गावांत २३३ मोठ्या व १९ मिनी अशा २५० अंगणवाडी केंद्रात डॉ़ एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया, स्तनदा माताना चौकस आहार व सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालके अशा १४ हजार ४७९ बालकांना आहाराचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल यांनी दिली़
बालक जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे़ अशा परिस्थितीत त्यांना अतिरिक्त आहार आणि विश्रांतीची गरज असते़ या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यानुसार १ हजार २५३ गरोदर स्त्रिया व १ हजार २७८ स्तनदामाता अशा २ हजार ५३१ लाभार्थ्यांना वरणभात, भाजीपोळी, शेंगदाणा लाडू किंवा अंडीे, केळी वाटप करण्यात येत आहे़ याशिवाय ७ महिने ते ६ वर्षेर् वयोगटातील ११ हजार ९४८ बालकांना अंडी किंवा केळी देण्याचे प्रस्तवित असून त्यानुसार हे वाटप करण्यात येत आहे, असे बागल यांनी माहिती देताना सांगितले़
कमी वजनाची बालकांचे प्रमाण ३३.१ टक्के
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक कॅलरीज व प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे़ आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात, असे अनेक संशोधन व अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.