राष्ट्रकुटकालीन कामदेव मंदिरास समस्यांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:44 AM2018-05-11T00:44:00+5:302018-05-11T00:44:00+5:30
पाणी प्रवाहावरील दोन मजली कामदेव वास्तू मंदिराला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे़ महाराष्ट्र राज्यातील प्राचीन वास्तू मंदिरापैकी कदाचित एकमेव असणारे मंदिर दुर्लक्षित असून त्याचे जतन करण्याचे मोठे आव्हान आहे़ अन्यथा राष्ट्रकुटकालीन (कृष्ण तिसरा) ऐतिहासिक वारसा पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे़
गंगाधर तोगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : पाणी प्रवाहावरील दोन मजली कामदेव वास्तू मंदिराला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे़ महाराष्ट्र राज्यातील प्राचीन वास्तू मंदिरापैकी कदाचित एकमेव असणारे मंदिर दुर्लक्षित असून त्याचे जतन करण्याचे मोठे आव्हान आहे़ अन्यथा राष्ट्रकुटकालीन (कृष्ण तिसरा) ऐतिहासिक वारसा पडद्याआड जाण्याची भीती व्यक्त होत आहे़
राष्ट्रकुटकालीन राजांनी शहर व परिसरात अनेक वास्तू उभारल्या़ भुईकोट किल्ला, प्रवेशद्वार, जगतुंग समुद्र, विविध मंदिराची उभारणी केली़ यातील अनेक वास्तू आज अस्तित्वात असल्या तरी त्यांचे पुरातत्वीय सौंदर्य पुसटसे झालेले दिसतात़ काही वास्तू काळाच्या ओघात इतिहासजमा झाल्या आहेत़ शासनाचे व पुरातत्व विभागाचा कानाडोळा संबंधित भागातील नागरिकांचे दुर्लक्ष आदीने अनेक वास्तू भग्नावशेश अवस्थेत दिसतात़
राष्ट्रकुटकालीन इतिहास सर्वधर्माचा आदर करणारा होता़ हिंदूंची जवळपास २६ मंदिरे या काळात होती़ त्यातील १२ मंदिराचा उल्लेख शिलालेखात आढळतो़ तशीच जैन मंदिर, बौद्ध मूर्ती शिल्पे या काळात मोठ्या प्रमाणात होती़ या काळातील राजांनी सर्वधर्मसमभाव जतन करण्याचा इतिहासाचा भक्कम पाया घातला़
शिलालेखात असलेले कामदेव मंदिर आहे़ हे दोन मजली होते़ वरचा मजला दुर्लक्षामुळे नामशेष झाला़ तळमजला आजही अनेक समस्यांचा सामना करत उभा आहे़ पाण्याच्या प्रवाहावरील मंदिराची वास्तू देखणी आहे़ जगतूंग समुद्राच्या दक्षिण-उत्तर लांबीच्या अंतिम टोकाला डाव्या बाजूस श्री शिवाजी कॉलेज, कंधारकडे जाताना या मंदिराचा भाग दिसतो़ मुख्यद्वार पश्चिम दिशेला तर दक्षिण-उत्तर दिशेला लहान द्वार होते़ प्रदक्षिणा पथ, गर्भगृह, समोर सभामंडप अशी रचना स्पष्टपणे दिसते़ मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर हौद होते़ याचा अर्थ या कुपनलिका असाव्यात़ पाणी स्वच्छ व नियंत्रण करणारी निगडी असावी़ कामदेव मंदिराजवळ कामाई मंदिर होते़ अश दंतकथा सांगितल्या जातात़ कारण कामाईचा संसार असलेल्या उखळ, जातं असल्याचे जाणवत होते़
आजही येथे पूजा-अर्चा केली जाते़ हे ग्रामदैवत असण्याची शक्यता आहे़ पाऊस होत नसेल तर धार्मिक कार्यक्रम येथे होतात़ आज हे कामदेव मंदिर दगडांनी भक्कम बांधलेले दिसते़ परंतु गाळ, काटेरी झुडूपांनी ग्रासले आहे़
पाणी प्रवाहावरील राष्ट्रकुटकालीन कामदेव मंदिराचा उल्लेख शिलालेखात आहे़ राजाश्रय असलयाने आपल्या उत्पन्नातून राजा पूजा-अर्चाचा, देखभालीचा खर्च करत होते़ याचे उत्खनन करावे, जेणेकरून इतिहास व संस्कृतीचे आकलन होईल़ शसन व पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे
-प्रोफेसर डॉ़अनिल कठारे (इतिहास संशोधन संचालक, कंधार)