नांदेडात बुधवारपासून शिक्षणाची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:58 AM2019-01-13T00:58:02+5:302019-01-13T00:58:48+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १६, १७ आणि १८ जानेवारी असे तीन दिवसीय ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे आयोजन चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड नांदेड येथे करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री आठवले यांनी पत्रपरिषदेत दिली़
नांदेड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १६, १७ आणि १८ जानेवारी असे तीन दिवसीय ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे आयोजन चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड नांदेड येथे करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री आठवले यांनी पत्रपरिषदेत दिली़
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मागील तीन वर्षांपासून राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या कार्यक्रमाचे विभागवार आयोजन केले जाते़ चालू शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षात मुंबई, कोल्हापूर, वर्धा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला़ या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरावरून निवडण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे ५० स्टॉल्स असणार आहेत़ यामध्ये प्रयोगशील शैक्षणिक साहित्य मांडण्यात येईल, असे बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़ दरम्यान, नांदेड येथे होणाऱ्या शिक्षणाच्या वारी या उपक्रमात नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भेट देवून पाहणी करणार आहेत़ प्रत्येक जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक, पालक, माध्यमिक शिक्षक आदी भेट देतील़ वारीसाठी येणाºया स्टॉल्सधारकांची, वरिष्ठ अधिकारी, पाहुणे यांची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे़ दरम्यान, नांदेडात होणाºया शिक्षणाच्या वारीच्या नियोजनासाठी सनियंत्रण समिती, स्वागत समिती, नाव नोंदणी समिती, निवास समिती, प्रथमोपचार व आपत्कालीन व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती, स्टॉल मांडणी समिती आदी समित्यांची स्थापना केली आहे़ त्याचबरोबर नियोजन करण्यासाठी डीआयईसीपीडीच्या प्राचार्या आठवले, निरंतरचे शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बालाजीराव कुंडगीर आदींच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत़ गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण हे या वर्षाच्या शिक्षणाच्या वारीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले़ पत्रपरिषदेस बालासाहेब कच्छवे, संजय शेळगे पाटील, अतुल कुलकर्णी, अनुप नाईक, राजाराम राठोड, शेख इरफान, पुणेकर, प्रा़देशमुख आदींची उपस्थिती होती़