उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम; आजची सचखंड एक्सप्रेस उद्या धावणार
By प्रसाद आर्वीकर | Published: January 1, 2024 03:43 PM2024-01-01T15:43:13+5:302024-01-01T15:45:02+5:30
सचखंड एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नांदेड : उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम मराठवाड्यातील रेल्वे वाहतुकीवर होत असून, १ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता सुटणारी सचखंड एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी २ जानेवारी रोजी सुटणार आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पसरली आहे. मोठ्या प्रमाणात धुके निर्माण झाल्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मराठवाड्यातून नांदेड येथून उत्तर भारतात धावणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. सर्वाधिक परिणाम सचखंड एक्सप्रेस या रेल्वे गाडीवर झाला आहे. मागील काही दिवसांपासून ही रेल्वे दररोज अनेक तास विलंबाने धावत आहे. १ जानेवारी रोजी नांदेड- अमृतसर (१२७१५) सचखंड एक्सप्रेस नांदेड येथून सकाळी ९:३० वाजता निर्धारित वेळेत सोडली जाणार होती.
उत्तर भारतातील धुक्यामुळे परतीच्या प्रवासातील गाडी उशिराने धावत आहे. त्यामुळे नांदेड येथून सोडल्या जाणाऱ्या गाडीच्या वेळेतही सुरुवातीला बदल करण्यात आला. सकाळी ९:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटेल, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते; परंतु त्यात पुन्हा बदल केला असून आता ही रेल्वे १ जानेवारी ऐवजी २ जानेवारी रोजी पहाटे ४:३० वाजता सुटणार आहे. तब्बल १९ तास उशिराने सचखंड धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सचखंड एक्सप्रेस विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पंजाब, दिल्ली येथून नांदेड येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भाविकांसाठी सचखंड एक्सप्रेस ही एकमेव रेल्वे आहे. मात्र या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.