नांदेडात उभारणार साडेआठ कोटींचे ईबीसी वसतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:58+5:302021-02-10T04:17:58+5:30
नांदेड येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु यावसतीगृहाला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे भाड्याच्या जागेत हे ...
नांदेड येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. परंतु यावसतीगृहाला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे भाड्याच्या जागेत हे वसतीगृह सुरु होते. स्वतःची इमारत नसल्यामुळे भाडे करार संपल्यानंतर वसतीगृहाची इमारत बदलण्याची वेळ येत होती.
या सर्व बाबींचा विचार करुन आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहासाठी पुरेशा प्रमाणात निवासाची सोय असलेले व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणारे वसतीगृह उभारण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने नव्यानेच निर्गमित केलेल्या आदेशानुसार नांदेड येथील वसतीगृहाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
या वसतीगृहावर ८ कोटी ५३ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. २०१९-२० च्या सुधारित दरसूचीनुसार बांधकामाच्या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली असून या तांत्रिक मान्यतेनंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या इमारतीमध्ये विद्युतीकरण, स्वच्छतागृह यासह दिव्यांगांसाठी आवश्यक असलेली तरतूद करण्यात आली आहे. वसतीगृहाला मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेमुळे आता भाड्याच्या जागेत सुरु असलेले हे शासकीय वसतीगृह लवकरच स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे.