राज्यभरात महिला पोलीस अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 04:27 PM2021-08-30T16:27:17+5:302021-08-30T16:34:36+5:30
Maharashtra Police News पोलीस कर्मचारी हिताच्या निर्णयाचा सध्या सपाटा सुरू असून, याबाबत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी शेअर करीत आहेत.
- शिवराज बिचेवार
नांदेड : नागपूर पोलिसांनी महिला अंमलदारांना आठ तासांचीच ड्युटी लावली आहे. महिला अंमलदारासाठी हा चांगला निर्णय असून, त्याची प्रतिक्रिया आणि परिणाम पाहून राज्यभरात याबाबत आदेश काढण्यात येतील, अशी माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली. त्यामुळे महिला अंमलदारांना मोठा दिलासा मिळणार असून, कुटुंबाला वेळ देता येणार आहे.
पोलीस कर्मचारी हिताच्या निर्णयाचा सध्या सपाटा सुरू असून, याबाबत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे हे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी शेअर करीत आहेत. त्यातच आता पोलीस कर्मचारी ते पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रस्तावाला येत्या गणेश चतुर्थीपूर्वी मान्यता मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावात असलेली एक त्रुटी दूर करण्यात आली आहे.
डीजी होम लोनसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरूच असून, या आठवड्यातही त्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. प्रशिक्षण केंद्रातील २४ टक्केबाबत पुढील आठवड्यात आदेश काढण्यात येणार आहे. पोलीस हवालदार ते पोलीस उपनिरीक्षकांचे २०१३ च्या परीक्षेतील १२५ जणांचे आदेश तयार आहेत. त्यातील त्रुटी दूर करून ३ तारखेपर्यंत आदेश काढण्यात येणार आहेत. २०१३ च्या बॅचमधील अंमलदाराच्या पदोन्नतीतील तफावत दूर करण्यात आली आहे, तर २०१६-१७ च्या बॅचमधील एपीआय ते पीआयमधील तफावतसुद्धा पुढील आठवड्यात दूर होणार आहे. २० दिवसांच्या किरकोळ रजेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. साप्ताहिक सुट्टीच्या अगोदर २४ तास ड्युटी बंद करण्याचाही महासंचालक कार्यालयाकडून विचार करण्यात येत आहे.
पोलिसांसाठी संवाद कक्ष
पोलिसांसाठी लवकरच संवाद कक्ष सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संवाद कक्षासाठी अगोदर हिंदीची अट होती. परंतु, तशी कोणतीही अट ठेवण्यात आली नाही, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.