८० टक्के पोलिसांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:49+5:302021-03-16T04:18:49+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून लसीकरणाचा वेगही दुप्पट झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के ...
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून लसीकरणाचा वेगही दुप्पट झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता केवळ २० टक्के कर्मचारीच लसीकरणाचे राहिले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता असून रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल प्रशासन यासह इतर फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. पोलीस, होमगार्ड यासह जवळपास पाच हजार जणांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये पोलीस दलात ८० टक्के जणांनी लस घेतली आहे. त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. आता उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लवकरच ही लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी न घाबरता नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात आजघडीला साडेतीन हजार पोलीस मनुष्यबळ आहे. त्यात एक हजाराच्या आसपास महिला कर्मचारी आहेत. आतापर्यंत जवळपास ९० टक्के महिला कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर काही कर्मचाऱ्यांनी दुसरा टप्पाही पूर्ण केला आहे. अद्यापही हे लसीकरण सुरूच आहे.
आता पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आघाडीवर पोलिसांना रहावे लागते. त्यामुळे कोरोनाचा धोका त्यांना अधिक असतो. त्यांना कोरोनाचा धोका होऊ नये यासाठी लसीकरणाचा वेगही आता चांगलाच वाढविण्यात आला आहे.
२५ टक्के पोलिसांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस
जिल्ह्यात जवळपास ८० टक्के पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यात आतापर्यंत २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून दररोज हे लसीकरण सुरूच आहे.