Eknath Shinde: व्ही-Vip गेस्ट हाऊसला गळती, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अंथरली ताडपत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 11:19 AM2022-08-07T11:19:20+5:302022-08-07T11:21:09+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी रात्री ते नांदेड मुक्कामी आहेत
नांदेड : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहाच्या धर्तीवर नांदेडमध्ये पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या व्हीआयपी रेस्टहाऊसला गळती लागली आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड मुक्कामी आहेत. त्यामुळे ताडपत्री झाकून गळती रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. रविवारी रात्री ते नांदेड मुक्कामी आहेत. त्यात विश्राम गृहाला गळती लागल्याने प्रशासनाचा एकच गोंधळ उडाला. रेस्टहाऊस वर कापड अंथरून गळती बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अवघ्या सात वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या रेस्टहाऊसची झालेली दुर्दशा म्हणजे विकासकामांचे पितळ उघडे पाडणारी आहे. एकूणच स्वतः थांबण्यासाठी राजकीय नेत्यांनी निर्मिती केलेल्या रेस्टहाऊसची ही स्थिती असेल तर इतर विकासकाम कसे असतील याच्या दर्जाचा विचार न केलेला बरा अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली आहे.